डिफेन्स-न्यूक्लियर एयरोस्पेस कॉरिडॉरच्या भूसंपादनाला उच्चाधिकार समितीचा ‘ग्रीन सिग्नल’
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 19:44 IST2026-04-09T19:44:49+5:302026-04-09T19:44:56+5:30
- सावनेरमध्ये २७२१.९४ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण होणार

डिफेन्स-न्यूक्लियर एयरोस्पेस कॉरिडॉरच्या भूसंपादनाला उच्चाधिकार समितीचा ‘ग्रीन सिग्नल’
कमलेश वानखेडे, नागपूर : सावनेर येथे प्रस्तावित डिफेन्स-न्यूक्लियर एयरोस्पेस कॉरिडॉर साकार होण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. उद्योग विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत या प्रकल्पासाठी तब्बल २७२१.९४ हेक्टर जमीन अधिग्रहणाच्या प्रस्तावाला हिरवा कंदील देण्यात आला आहे.
या प्रकल्पासाठी सावनेरचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. या प्रकल्पामुळे विदर्भातील औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. हा प्रकल्प सावनेर औद्योगिक क्षेत्रात साकार होणार असून, एकूण २७२१.९४ हेक्टर (सुमारे ६७२५.९८ एकर) क्षेत्राचा समावेश आहे. यामध्ये २६०१.२० हेक्टर खासगी जमीन तर १२०.७४ हेक्टर शासकीय जमीन आहे. जमीन अधिग्रहण प्रक्रिया महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ अंतर्गत राबविण्यात येणार आहे. या कॉरिडॉरमध्ये एयरोस्पेस (विमान, ड्रोन, उपग्रह घटक), संरक्षण उत्पादन (शस्त्रास्त्रे, क्षेपणास्त्रे, दारूगोळा), न्यूक्लियर तंत्रज्ञान, रोबोटिक्स आणि प्रगत अभियांत्रिकी क्षेत्रातील उद्योग विकसित करण्याचा मानस आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ आणि संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या धोरणाला बळकटी देण्यासाठी देशभरात डिफेन्स कॉरिडॉर उभारले जात आहेत. उत्तर प्रदेश आणि तमिळनाडू येथील डिफेन्स इंडस्ट्रियल कॉरिडॉरनंतर आता महाराष्ट्रातही अमरावती, वर्धा, नागपूर आणि सावनेर या भागांचा समावेश करून अशा प्रकारचा कॉरिडॉर विकसित करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.
आ. डॉ. आशिष देशमुख यांनी हा प्रकल्प सावनेर येथे सुरू करावा, यासाठी सुरुवातीपासूनच सातत्याने प्रयत्न केले. यासाठी त्यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांना २२ ऑगस्ट २०२५ ला पत्राद्वारे डिफेन्स न्यूक्लिअर एरोस्पेस (डीएनए) या क्षेत्रात काम करणारे 'रक्षा कॉरिडॉर' (डीएनए) सावनेर येथे सुरू करण्याची मागणी देखील केली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे आणि पुढाकारामुळे या प्रस्तावित प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली आहे. विदर्भाच्या दृष्टीने प्रस्तावित या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक होईल. स्थानिक युवकांना रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील. नागपूर व विदर्भाचा औद्योगिक विकास वेगाने होईल.
- डॉ. आशीष देशमुख, आमदार, सावनेर विधानसभा क्षेत्र