लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थानातील निर्माणाधीन प्रवेशद्वाराची स्लॅब कोसळल्याच्या घटनेनंतर विविध दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. मात्र, संबंधित घटना नेमकी कशी घडली, याबाबत महिन्याभरात उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार आहे. यासंदर्भात महसूलमंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्देश दिले. रविवारी त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
शनिवारी रात्री श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थानातील निर्माणाधीन प्रवेशद्वाराची स्लॅब कोसळली होती. त्यात अनेक कामगार जखमी झाले होते. बुलढाणा दौरा आटोपून नागपुरात परतल्यावर बावनकुळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी अधिकाऱ्यांकडून तपशील जाणून घेतले. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मंदिर परिसरात विकासकार्य सुरू आहे. याठिकाणी तीन महाद्वार होत आहेत. दोन महाद्वारांचे काम पूर्ण झाले. मात्र, या द्वाराच्या कामात नेमके काय झाले, हे चौकशीअंती पुढे येईल. या विकासकामांच्या देखरेखीची जबाबदारी व्हीएनआयटी आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट एजन्सीकडे आहे. त्यानंतरसुद्धा अशी घटना घडली. त्यामुळे या घटनेची एक महिन्यात चौकशी पूर्ण करून त्यात कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यानी सांगितले. मंदिर परिसरात होणाऱ्या प्रत्येक कामाकडे मी आवर्जून लक्ष देतो. कामात चूक होणार नाही, भ्रष्टाचार होणार नाही, याकडे माझे लक्ष असते. मात्र, मी बुलढाणा दौऱ्यावर असताना ही घटना घडली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. जे जखमी झाले आहेत त्यांना शासनाकडून आणि मंदिर प्रशासनाकडून संपूर्ण मदत केली जाईल, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.