पोलिस निरीक्षक अभय आष्टेकर यांच्याविरुद्ध हायकोर्टाचा वॉरंट
By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: July 1, 2024 18:36 IST2024-07-01T18:35:27+5:302024-07-01T18:36:08+5:30
Nagpur : आरोपींना जामीनपात्र गुन्ह्यांमध्ये अटक करणे अंगलट

High Court Warrant against Police Inspector Abhay Ashtekar
राकेश घानोडे
नागपूर : पाच आरोपींना अवैधपणे अटक करण्याच्या आरोपावर स्पष्टीकरण मागणारी नोटीस तामील झाल्यानंतरही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये सतत गैरहजर राहिल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडाचे पोलिस निरीक्षक अभय आष्टेकर यांच्याविरुद्ध पाच हजार रुपयाचा जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला आहे. तसेच, त्यांना येत्या १० जुलै रोजी न्यायालयात हजर होण्याचा आदेश देण्यात आला आहे.
प्रकरणावर न्यायमूर्तिद्वय विभा कंकणवाडी व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. आष्टेकर यांनी या प्रकरणाचे गांभिर्य विचारात घेतले नाही, असे परखड मत न्यायालयाने वॉरंट बजावताना नमूद केले. आष्टेकर यांच्याविरुद्ध पीडित आरोपी नासीर अलीम हाशमी, शाबीर अलीम हाशमी, विनोद नारायण मेश्राम, ईश्वर वामन ठाकूर व एजाज रफीक शेख यांनी याचिका दाखल केली आहे. त्यांच्यावर खुशाल बनसोड यांना गंभीर मारहाण केल्याचा आरोप आहे. कुरखेडा पोलिसांनी २६ सप्टेंबर २०२२ रोजी बनसोड यांच्या तक्रारीवरून या आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३२५, ३९४, १४३, १४७, १४८, १४९ व महाराष्ट्र पोलिस कायद्यातील कलम १३५ अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. हे सर्व गुन्हे जामीनपात्र आहेत. त्यामुळे आष्टेकर यांनी आरोपींना जामीन देणे आवश्यक होते. परंतु, त्यांनी सर्व आरोपींना अटक केली. परिणामी, सर्वोच्च न्यायालयाने अर्नेशकुमार प्रकरणात दिलेल्या निर्णयाची पायमल्ली झाली, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. मिर नगमान अली यांनी कामकाज पाहिले.