हायकोर्ट : पूनम अर्बनच्या पाच संचालकांना दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 00:29 IST2019-11-28T00:28:12+5:302019-11-28T00:29:08+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पूनम अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमधील ५.२५ कोटी रुपयाच्या घोटाळ्यात आरोपी असलेल्या पाच संचालकांना जामीन मंजूर करण्यास नकार दिला.

हायकोर्ट : पूनम अर्बनच्या पाच संचालकांना दणका
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पूनम अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमधील ५.२५ कोटी रुपयाच्या घोटाळ्यात आरोपी असलेल्या पाच संचालकांना जामीन मंजूर करण्यास नकार दिला. त्यामुळे संचालकांनी न्यायालयाच्या परवानगीने आपापले अर्ज मागे घेतले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे संचालकांना जोरदार दणका बसला.
चंद्रकांत अजाबराव बिहारे, सुभाष शुक्ला, डॉ. प्रियदर्शन नारायण मंडलेकर, अरुण लक्ष्मण फलटणकर व राजू रामभाऊ घाटोळे अशी अर्जदार संचालकांची नावे आहेत. संस्थेने ग्राहकांकडून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी स्वीकारल्या होत्या. ते पैसे कर्ज स्वरूपात वाटप करण्यात आले होते. त्या कर्जाची परतफेड झाली नसल्यामुळे संस्था आर्थिक अडचणीत सापडली. ठेवी परत करणे बंद झाल्यानंतर ग्राहकांनी सक्करदरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आरोपींविरुद्ध फसवणूक, विश्वासघात, कट रचणे इत्यादी गुन्ह्यांतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला आहे. आरोपींनी अवैधपणे कर्ज वाटप करून आर्थिक गैरव्यवहार केला, असे ठेवीदारांचे म्हणणे आहे.