नागपुरात ‘हाय अलर्ट’, संघ मुख्यालयाच्या सुरक्षेचा अधिकाऱ्यांकडून आढावा, जिल्ह्यातदेखील सुरक्षाव्यवस्थेत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 23:11 IST2025-11-10T23:10:47+5:302025-11-10T23:11:22+5:30
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर नागपूर पोलीस ‘हाय अलर्ट’वर आहेत. शहरातील संवेदनशील भागात पोलिसांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

नागपुरात ‘हाय अलर्ट’, संघ मुख्यालयाच्या सुरक्षेचा अधिकाऱ्यांकडून आढावा, जिल्ह्यातदेखील सुरक्षाव्यवस्थेत वाढ
नागपूर : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतरनागपूर पोलीस ‘हाय अलर्ट’वर आहेत. शहरातील संवेदनशील भागात पोलिसांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. तसेच रात्रीच्या गस्तीत वाढ करण्यात आली आहे. याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महालातील मुख्यालय तसेच रेशीमबाग येथील डॉ.हेडगेवार स्मृतिमंदिर परिसराच्या सुरक्षेचादेखील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रात्री आढावा घेतला.
या स्फोटानंतर रेल्वे स्थानक, बस स्टँड आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. शहरात येणाऱ्या वाहनांचीदेखील तपासणी केली जात आहे. सुरक्षा यंत्रणांकडून नागपुरसाठी विशेष अलर्ट जारी करण्यात आलेला नसला तरी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून सर्व अधिकारी व पोलीस ठाण्यांना अलर्टवर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय दीक्षाभूमीच्या सुरक्षाव्यवस्थेचादेखील पोलिसांनी आढावा घेतला. नागपुरात संरक्षण मंत्रालयाशी निगडीत अनेक आस्थापना आहेत. त्यामुळे त्या भागांतदेखील पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे.
रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संघ मुख्यालयाच्या सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला. त्यांनी संघ मुख्यालयाच्या आत जाऊन केंद्रीय सुरक्षायंत्रणांच्या अधिकाऱ्यांशीदेखील चर्चा केली. संघ मुख्यालयात २४ तास सुरक्षाव्यवस्था तैनात असते. मात्र आता तिकडे जाणाऱ्या मार्गांवरदेखील सुरक्षा यंत्रणांचे लक्ष राहणार आहे.
जिल्ह्यातील संवेदनशील भागांतदेखील बंदोबस्त वाढविला
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर जिल्ह्यातदेखील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. विशेषत: संवेदनशील भागांत बारीक लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परिसरात कुठलीही संशयास्पद वस्तू आढळल्यास तातडीने पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन विविध वस्त्यांमध्ये फिरून करण्यात येत आहे. जिल्ह्यातील संपूर्ण पोलीस यंत्रणा अलर्टवर असल्याची माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली.