घरी कुणीतरी वाट बघतंय याचं भान ठेवा; रस्ते अपघातावर नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
By मोरेश्वर मानापुरे | Updated: January 11, 2025 20:11 IST2025-01-11T20:10:24+5:302025-01-11T20:11:52+5:30
रस्ते सुरक्षा कार्यक्रमात अनुपम खेर यांनी नितीन गडकरींची मुलाखत घेतली. या मुलाखतीत गडकरी यांनी नव्या निर्णयाबद्दल माहिती दिली.

घरी कुणीतरी वाट बघतंय याचं भान ठेवा; रस्ते अपघातावर नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
नागपूर : रस्ते अपघातातअपघातग्रस्तांना ‘गोल्डन अव्हर’मध्ये मदत करणे अत्यावश्यक आहे. आतापर्यंत मदत करणाऱ्यांना ५ हजार रुपये मिळायचे. आता ते वाढून २५ हजार रुपये करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारतीय राष्ट्रीय महामार्ग परिवहन अणि न्यूज-१८ लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रस्ते सुरक्षा कार्यक्रमांत शनिवारी अभिनेते अनुपम खेर यांनी नितीन गडकरी यांची वनामती सभागृहात प्रकट मुलाखत घेतली. गडकरी यांनी अनुपम खेर यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिली.
शालेय जीवनातच वाहतुकीच्या नियमांचे धडे द्या
गडकरी म्हणाले, "वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांना दंड ठोठावला. कायदे कडक केले; तरीही रस्ते अपघातातील मृत्यू थांबलेले नाहीत. मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत आपण यावर नियंत्रण मिळवू शकत नाही. शालेय शिक्षण घेण्याच्या वयात मुलांवर चांगल्या गोष्टींचा प्रभाव पडला तर तो कायमस्वरुपी राहतो. त्यामुळे शालेय जीवनातच वाहतुकीच्या नियमांचे धडे मिळणे आवश्यक आहे."
घरी कुणीतरी वाट बघतोय याचे भान ठेवा -नितीन गडकरी
एका प्रश्नाच्या उत्तरात गडकरी म्हणाले, "कोरोना, युद्धामध्ये किंवा एखाद्या दंग्यामध्ये जेवढ्या लोकांचा मृत्यू झाला नसेल तेवढे मृत्यू दरवर्षी रस्ते अपघातामध्ये होतात. याची मला खंत वाटते. त्यात १८ ते ३४ वयोगटातील तरुणांची संख्या जास्त आहे. एखाद्या घरातील तरुण अचानक निघून जातो, तेव्हा त्या कुटुंबावर कोसळणाऱ्या संकटाची आपण कल्पनाही करू शकत नाही."
"देशात आणखी उत्तम रस्ते तयार होतील. पण लोकांना शिस्त नसेल तर या रस्त्यांचा काहीही उपयोग नाही. सिग्नल तोडणे, लेन तोडून निघून जाणे, मर्यादेपेक्षा जास्त वेगाने गाडी चालणे, हेल्मेट न लावणे, सिटबेल्ट न बांधणे अशा कितीतरी चुका लोक करतात. घरी आई, पत्नी, मुले वाट बघत असतील, याचे भान ठेवून गाडी चालवावी", असे आवाहन नितीन गडकरींनी केले.
रस्ते सुरक्षा संदर्भात समाजातील स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन काम करावे. रस्ते सुरक्षा क्षेत्रात काम करणारे राजू मानकर आणि चंद्रशेखर मोहिते यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
अपघातात ३० हजार व्यक्तींचा विना हेल्मेटमुळे मृत्यू
भारतात १० हजार विद्यार्थी हे शाळेच्या आजूबाजूची सदोष ट्रॅफिक व्यवस्था आणि चौकाची रचनेमुळे अपघाताला बळी पडतात. ३० हजार व्यक्ती बिना हेल्मेटमुळे दगावतात. नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि रोडमार्क संस्थेने ४८ ब्लॅक स्पॉट दुरुस्त केल्यानंतर नागपूर ग्रामीणमध्ये राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची संख्या ४८ टक्क्यांनी कमी झाली.
हेल्मेट न घातलेल्यांना थेट कोठडीत टाका
कार्यक्रमात अनुपम खेर यांनी शालेय विद्यार्थ्यांनी काही प्रश्न विचारले. एका विद्यार्थ्याने हेल्मेट न घातलेल्यांना दंड ठोठावण्याऐवजी थेट कोठडीत टाकण्याचा सल्ला गडकरींनी दिला.
कार्यक्रमाला वाहतूक पोलीस उपायुक्त अर्चित चांडक, राज्य परिवहन कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी, रस्ते सुरक्षा संदर्भात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्ते उपस्थित होते.