नागपुरात पावसाचे थैमान, एकाचा मृत्यू, दोघे वाहून गेले, ११ जणावरे मृत
By आनंद डेकाटे | Updated: July 9, 2025 19:12 IST2025-07-09T19:11:45+5:302025-07-09T19:12:35+5:30
Nagpur : ४५७ घरांचे नुकसान, पुरातील १३८ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले

Heavy rains in Nagpur, one dead, two washed away, 11 dead
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. नदी नाले ओसंडून वाहत आहेत. जिल्ह्यातील १४ पैकी १३ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. उप्पलवाडी येथील १८ वर्षे वयाचा कार्तिक शिवशंकर लाडपे या युवकाचा नाल्याचा प्रवाहात वाहून मृत्यू झाला असून कळमेश्वर तालुक्यातील मौजे बोरगाव येथील अनिल हनुमान पानपत्ते या ३५ वर्षे व्यक्ती नाल्याच्या प्रवाहात वाहून गेला असून त्याचा शोध सुरु आहे. नरसाळा-हुडकेश्वर येथील एकव्यक्ती सुद्धा वाहून गेला. जिल्ह्यात सुमारे ११ जनावरे मृत, २ जखमी, सुमारे ४५३ घरांचे अंशत: तर ४ घरांचे पूर्णत: नुकसान झाले.
८ जुलै रोजी जिल्ह्यात सरासरी १४० मिलिमिटर पाऊस झाला. उमरेड आणि कुही तालुक्यात २०० पेक्षा जास्त मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शहरातही १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत १३८ हून अधिक लोकांना पावसाच्या वेढ्यातून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. बचाव केलेले १३८ नागरीक हे कामठी, नागपूर ग्रामीण, नागपूर शहर व कुही तालुक्यातील आहेत.
२३ पुलांवरून पाणी ओव्हरफ्लो, काही तासांसाठी गावांचा संपर्क तुटला जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे स्थानिक नदी,नाले यांना पुर येवून शहरी तसेच ग्रामीण भागातील २३ पुलावरून पाणी ओव्हरफ्लो झाले. काही तासांकरिता काही गावांचा संपर्क तुटला. आलेल्या पुरामध्ये काही नागरीक अडकले असता त्यांना स्थानिक तसेच एसडीआरफ व एनडीआर पथकाच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढण्यात आले. नागपूर ग्रामीण तालुक्यात २४६ घरांमध्ये पाणी शिरले.
विनाकारण घराबाहेर पडू नका , जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
गरज नसल्यास विनाकारण नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. हवामान विभागाचा अंदाज लक्षात घेता पाऊस वाढण्याची शक्यता लक्षात घेता सर्व ती खबरदारी घेण्यात येत आहे. नरसाळा हुडकेश्वर येथील एक इसम पाण्यात वाहून गेला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.
गरज पडल्यास सैन्यदलाची मदत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आवश्यक सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. गरज भासल्यास राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (एनडीआरएफ) तसेच सैन्यदलाची मदत घेण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना केल्या असल्याचे जिल्हाधिकारी इटनकर यांनी सांगितले.