लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर/ हिंगणा : शिकवणी वर्गातून मुला-मुलीला परत आणायला गेलेल्या आईवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ऑटोतून खाली उतरल्यावर मागून आलेल्या भरधाव ट्रकने तिच्या डोळ्यासमोर सात वर्षीय मुलाला चिरडले अन् फरफटत घेऊन गेला. जखमी मुलाचा जागीच मृत्यू झाला अन् क्षणात संपूर्ण कुटुंबाच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली.
हिंगणा मार्गावर झालेल्या या घटनेनंतर तणावाचे वातावरण होते. आहान सूरज नायक (७, श्रमिकनगर, हरिगंगा, एमआयडीसी) असे मृतक मुलाचे नाव आहे. तुलसी सूरज नायक (२७) या त्यांची मुलगी स्नेहा (९) व आहान यांना रामदासपेठ येथे शिकवणी वर्गातून घेऊन येत होत्या. दुपारी चार वाजताच्या सुमारास ऑटो हिंगणा नाका टी पॉइंट येथे हिंगण्याकडे जाणाऱ्या मार्गावर थांबला. तुलसी या ऑटोचालकाला पैसे देत होत्या व स्नेहा तसेच आहान खाली उतरले होते. त्याचवेळी नागपूरहून हिंगण्याच्या दिशेने एमएच ४० सीआर ५१०० हा ट्रक वेगाने आला. त्याने आहानला जोरात धडक दिली. आहान ट्रकच्या चाकाखाली आला व देशमुख ट्रेडिंग कंपनीच्या समोरून काही अंतरावर ट्रकने त्याला फरफटत नेले. त्यानंतर ट्रकचालक तेथून फरार झाला. हा प्रकार पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला.
घटनास्थळावरील लोकांनी आहानकडे धाव घेतली. तर तुलसी यांच्या पायाखालची जमीनच निसटली. लोकांनी आहानला लता मंगेशकर रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांना या अपघाताची माहिती देण्यात आली. पोलिसांनी काही अंतरावरून ट्रकचालकाला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात एमआयडीसी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांचा कुठलाही वचक नसल्याने या मार्गावर वेगाची मर्यादा न पाळता मनमर्जीने जड वाहनांची वाहतूक सुरू असते.
कुटुंबाच्या स्वप्नांची राखरांगोळी
आहानचे वडील सूरज नायक (३२) हे ऑटोचालक आहेत. आपली मुले शिकली पाहिजेत हे नायक दाम्पत्याचे स्वप्न होते. आहान व स्नेहा हे दोघेही प्रिया विद्याविहार शाळेत शिकत होते. दोघेही रामदासपेठला शिकवणी वर्गासाठी जात होते. तुलसी या स्वत: ऑटोने त्यांची ने-आण करत होत्या. मुलगा व मुलगी शिकून मोठे व्हावे यासाठी पती-पत्नीचा आटापिटा सुरू होता. मात्र भरधाव ट्रकचालकाने त्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली.
भरधाव वाहनांवर नियंत्रण नाहीच
हिंगणा मार्गावर भरधाव वाहने चालतात. त्या ठिकाणी वाहतूक पोलिस नावालादेखील नसतात. जर एखादेवेळी बंदोबस्ताला आलेच तर वसुलीवरच जास्त भर दिसून येतो. या मार्गावर गतिरोधक व्हावे अशी मागणी होत असूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याच दुर्लक्षामुळे चिमुकल्या आहानचा बळी गेला.