तो रिकाम्या गाडीत झोपून होता; अन् ... इंटरसिटी एक्सप्रेसमधील घटना : कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे अल्पवयीन मुलगा बचावला
By नरेश डोंगरे | Updated: August 11, 2025 22:14 IST2025-08-11T22:14:18+5:302025-08-11T22:14:45+5:30
मात्र, त्याला झोप लागल्याने तो गाडीतच राहून गेला. दरम्यान, ही गाडी देखभालीसाठी अजनी रेल्वे यार्डात पोहोचली.

तो रिकाम्या गाडीत झोपून होता; अन् ... इंटरसिटी एक्सप्रेसमधील घटना : कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे अल्पवयीन मुलगा बचावला
नागपूर : रेल्वे कर्मचााऱ्यांनी यार्डमध्ये उभी असलेल्या इंटरसिटी एक्सप्रेसच्या रिकाम्या कोचला लॉक करताना पुरेशी काळजी घेतल्यामुळे एका अल्पवयीन मुलाचा जीव बचावला. रविवारी अजनीच्या रेल्वे यार्डात ही घटना घडली.
सुहास (नाव काल्पनिक) हा अल्पवयीन मुलगा रागाच्या घरात घरून निघाला आणि इकडे-तिकडे भटकत रेल्वेस्थानकावर आला. तेथून तो ट्रेन नंबर १२११९ इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये बसला. ही गाडी नागपूरला आल्यानंतर सर्व प्रवासी उतरले. मात्र, त्याला झोप लागल्याने तो गाडीतच राहून गेला. दरम्यान, ही गाडी देखभालीसाठी अजनी रेल्वे यार्डात पोहोचली.
तेथे रिकाम्या रॅकला रेल्वे कर्मचारी लॉक करू लागले. तत्पूर्वी त्यांनी प्रत्येक रिकाम्या लॉकची बारकाईने तपासणी केली. यावेळी एका रॅकमध्ये सुहास झोपलेला दिसला. संबंधित कर्मचाऱ्यांनी त्याला झोपेतून उठवले आणि त्याची विचारपूस केली. भांबावलेल्या या बालकाने घरून निघाल्यानंतर भटकत रेल्वेस्थानकावर आलो आणि चुकीने दुसऱ्याच गाडीत बसल्याचे त्याने सांगितले. त्याची अवस्था बघून कर्मचाऱ्यांनी रेल्वे सुरक्षा दलाला (आरपीएफ) माहिती दिली. त्यानंंतर सुहासकडून माहिती घेऊन त्याच्या पालकांशी संपर्क करण्याचे आरपीएफ जवानांनी वारंवार प्रयत्न केले. मात्र, तिकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याची वैद्यकीय तपासणी करून घेत त्याला शासकीय बालसुधारगृहात पाठविण्यात आले.
...तर अनर्थ झाला असता
रेल्वे कर्मचाऱ्यांनी पुरेशी काळजी न घेता रिकामा रॅक लॉक केला असता तर गाडीच्या कोचमध्ये झोपून असलेल्या सुहासला हवा मिळाली नसती. अर्थात त्याला श्वासोच्छ्वास घेण्यास अडचण झाली असती. मात्र, कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य पूर्ण प्रामाणिकपणे बजावल्याने मोठा अनर्थ टळला.