दारू प्यायला, पैसे दिले नाही म्हणून भोसकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 00:11 IST2020-09-26T00:09:54+5:302020-09-26T00:11:53+5:30
दारू प्यायला पैसे देण्यास नकार दिला म्हणून तीन अज्ञात आरोपींनी एका व्यक्तीला चाकूने भोसकून गंभीर जखमी केले. गुरुवारी रात्री १०. ३० च्या सुमारास कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

दारू प्यायला, पैसे दिले नाही म्हणून भोसकले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दारू प्यायला पैसे देण्यास नकार दिला म्हणून तीन अज्ञात आरोपींनी एका व्यक्तीला चाकूने भोसकून गंभीर जखमी केले. गुरुवारी रात्री १०. ३० च्या सुमारास कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. रोशन फागुजी साखरे (वय ४०) हे नारी मार्गावरील तक्षशिला नगरात राहतात. गुरुवारी रात्री १०.३० च्या सुमारास ते कपिलनगर चौकात एका हार्डवेअर समोर उभे होते. त्यांच्याजवळ तीन आरोपी आले. ओळखी नसतानादेखील या तिघांनी साखरे यांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले. साखरे यांनी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे तीनपैकी एका व्यक्तीने आपल्या खिशातील चाकू काढून साखरेंना भोसकले. यावेळी अन्य दोन आरोपींनी साखरे यांना मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या साखरेंनी आरडाओरड केल्यामुळे आजूबाजूची मंडळी धावली. परिणामी आरोपी पळून गेले. साखरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. कपिलनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला. त्यांचा शोध घेतला जात आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यात एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका १६ वर्षाच्या व्यसनाधीन आरोपीने दारूसाठी शंभर रुपये दिले नाही म्हणून टायगर नामक तरुणाची हत्या केली होती.
यशोधरानगरातही प्राणघातक हल्ला
यशोधरानगरात कावरापेठ भागात राहणारा राहुल बोकडे (वय २४) याला आरोपी कुणाल हेडावू आणि त्याच्या साथीदारांनी जुन्या वादातून गुरुवारी रात्री ९च्या सुमारास शस्त्राने हल्ला चढवून गंभीर जखमी केले. राधिका विनायक बोकडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.