हायकोर्ट : भंडाऱ्यातील फाशी प्रकरणावर गुरुवारी सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 22:46 IST2019-02-20T22:43:59+5:302019-02-20T22:46:22+5:30

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित भंडाऱ्यातील फाशी प्रकरणावर गुरुवारी न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी होणार आहे.

HC: Hearing on Thursday on capital punishment in Bhandara | हायकोर्ट : भंडाऱ्यातील फाशी प्रकरणावर गुरुवारी सुनावणी

हायकोर्ट : भंडाऱ्यातील फाशी प्रकरणावर गुरुवारी सुनावणी

ठळक मुद्देप्रीती बारिया खून प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित भंडाऱ्यातील फाशी प्रकरणावर गुरुवारी न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी होणार आहे.
३० जून २०१८ रोजी भंडारा सत्र न्यायालयाने प्रीती बारिया खून प्रकरणातील नराधम आरोपी अमीर एजाज शेख व सचिन कुंडलिक राऊत यांना फाशीची शिक्षा सुनावली. ती शिक्षा कायम करण्यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. तसेच, आरोपींनी त्यांच्या शिक्षेला अपीलद्वारे आव्हान दिले आहे. ही घटना ३० जुलै २०१५ रोजी घडली होती. तकिया वॉर्डमध्ये बारिया यांचे घर आहे. आरोपींनी रात्री एसी दुरुस्त करण्याच्या बहाण्याने त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर संधी पाहून प्रीती बारिया (३०) यांना डोक्यावर हातोडीने वार करून ठार मारले. दरम्यान, बारिया यांचा मुलगा भव्य (९) त्या ठिकाणी आला असता आरोपींनी त्याच्याही डोक्यावर हातोडीने वार केले. त्यामुळे भव्यला कायमचे अपंगत्व आले. त्यापूर्वी आरोपींनी दुपारी म्हाडा कॉलनीतील रवींद्र शिंदे यांच्या घरीदेखील एसी दुरुस्तीच्या बहाण्याने प्रवेश केला होता व त्यांची मुलगी अश्विनी हिच्या डोक्यावर लोखंडी हातोडीने वार केले होते. तेव्हापासून अश्विनीलाही कायमचे अपंगत्व आले. एसी दुरुस्त करण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करणे, संधी पाहून घरातील व्यक्तींचा खून करणे व त्यानंतर घरातील मुद्देमाल चोरून नेणे, ही आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत होती.

Web Title: HC: Hearing on Thursday on capital punishment in Bhandara