लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण व शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याच्या खटल्यात आरोपी असलेले कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मंगळवारी सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. त्यामुळे न्यायालयाने सोनेगाव पोलिसांना नोटीस बजावून येत्या गुरुवारी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. अर्जावर न्यायाधीश एस. एम. जी. बैस यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
या खटल्याच्या तारखांना जाधव वारंवार अनुपस्थित राहत होते. त्यामुळे सत्र न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केला होता. परिणामी, जाधव यांनी सोमवारी न्यायालयात हजर होऊन अटक वॉरंट रद्द करण्यासाठी अर्ज दाखल केला. तेव्हा न्यायालयाने त्यांना, ते स्वतःच्या बचावासाठी कोणते साक्षीदार तपासणार आहेत, अशी विचारणा करून साक्षीदारांची यादी मागितली. परंतु, जाधव यांनी याकरिता १० दिवसाचा वेळ देण्याची मागणी केली. त्यांचा हा निष्काळजीपणा व इतर काही बाबी लक्षात घेता न्यायालयाने पोलिसांना अटक वॉरंटची अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. जाधव यांच्यातर्फे अॅड. प्रकाश जयस्वाल यांनी बाजू मांडली.
जाधव यांची कारागृहात रवानगीमाजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना न्यायालयाच्या आदेशाने नागपूर पोलिसांनी सोमवारी अटक केली होती. त्यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यामुळे त्यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, मंगळवारी त्यांची प्रकृती ठीक झाल्यानंतर दुपारी ४ वाजता सोनेगाव पोलिसांनी त्यांना मेयो रुग्णालयातून ताब्यात घेतले. त्यानंतर सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास त्यांना मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आल्याची माहिती सोनेगावचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन मगर यांनी दिली.