महिलांकडून होतो छळ; पीडित पुरुषांच्या वाढल्या तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 10:56 IST2021-06-15T10:55:52+5:302021-06-15T10:56:27+5:30
Nagpur News पत्नीच्या छळाविरुद्ध पुरुषांनी केलेल्या तक्रारीचीही नोंद भरोसा सेलमध्ये झालेली आहे. या तक्रारीचे प्रमाण चक्क १० टक्क्यांवर गेले आहे.

महिलांकडून होतो छळ; पीडित पुरुषांच्या वाढल्या तक्रारी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घरगुती कारणांवर होणारा महिलांचा छळ आणि तक्रारी, तसेच पुरुषांवर पोलिसांनी केलेली कारवाई हा नेहमीचाच भाग आहे. मात्र, पत्नीच्या छळाविरुद्ध पुरुषांनी केलेल्या तक्रारीचीही नोंद भरोसा सेलमध्ये झालेली आहे. या तक्रारीचे प्रमाण चक्क १० टक्क्यांवर गेले आहे.
काेराेना काळात कामधंदे बंद असल्याने अनेक जण घरी असल्याने, कुटुंबातील संवादसुख वाढण्याची अपेक्षा होती. मात्र, झाले उलटे. घरात पुरुष राहू लागल्याने, तो प्रत्येक गोष्टीत नाक खुपसतो. पत्नीला मोकळेपणाने इकडे-तिकडे जात येत नसल्याने, संशयकल्लोळ वाढला आहे. यातूनच अनेक कुटुंबांत संवादाएवेजी वाद वाढल्याचे वास्तव पुढे आले आहे.
२०२० मध्ये भरोसा सेलकडे एकूण १,४३८ तक्रारी आल्या होत्या, तर १ जानेवारी ते १३ जूनपर्यंत ७८७ तक्रारी भरोसा सेलकडे आलेल्या आहेत. त्यात पत्नीकडून छळ होत असलेल्या पुरुषांनी नोंदविलेल्या तक्रारींची संख्या गेल्या वर्षी १५२ होती, तर आता ६ महिन्यांत हा आकडा ८० वर पोहोचला आहे.
रिकामटेकडे ऑर्डर
काेराेना संसर्गाच्या भीतीमुळे अनेकांचे काम बंद झाल्यामुळे. बाहेर विनाकारण पडले, तर कारवाईचा धाक असल्याने घरात राहण्याशिवाय पर्याय नसल्याने घराघरात पुरुष मंडळी पडून राहू लागली. त्यामुळे त्याच्या मागण्याही वाढल्या. नुसता घरात पडून राहतो अन् ऑर्डर सोडतो, अशी भावना झाल्याने महिला पाणउतारा करतात.
हस्तक्षेप वाढल्याची भावना
वारंवार चहा मागतो, आज हे कर, उद्या ते कर, हे का केले नाही, ते का केले नाही. तू घर स्वच्छ ठेवत नाही. मुलांवर रागावते. आईला वेळेवर जेवण देत नाही. माझ्यासमोर असे आहे, तर मागे कसे राहत असेल, असे पुरुष मंडळीकडून टोमणे हाणले जात असल्याचे महिलांच्या तक्रारीत नमूद आहे. तू सारखी मोबाइलमध्येच गुंतून राहते, घराकडे अजिबात लक्ष देत नसल्याची कुरबुर नवरा करत असल्यामुळे आणि सारखा हस्तक्षेप करत असल्यामुळे पतीसोबत तोंड वाजत असल्याचे महिलांच्या तक्रारीत नमूद आहे.
पती-पत्नी विभक्त झाल्यास सर्वाधिक नुकसान मुलांचे होते. त्यांच्यावर भावनिक आघातही होतो. त्यामुळे कुणाचाही संसार तुटू नये, यासाठी आम्ही भरसक प्रयत्न करतो. मुलांच्या भविष्यावर होणारे परिणाम समोर ठेवून पती-पत्नीचे समुपदेशन करतो. त्यामुळे अनेक संसाराची विस्कटलेली घडी नीट करण्यात आम्ही यशस्वी होतो.
रेखा संकपाळ
सहायक पोलीस निरीक्षक भरोसा सेल प्रमूख, नागपूर.
---