हाच खरा मुन्नाभाई एमबीबीएस...
By Admin | Updated: May 12, 2014 00:55 IST2014-05-12T00:55:22+5:302014-05-12T00:55:22+5:30
साधे एक पुस्तक एखाद्या गुंडाचे अख्खे आयुष्य बदलू शकते, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. मात्र मुंबईच्या गुन्हेगार विश्वातील एका कुख्यात गुंडाच्या जीवनात हा बदल घडला. ‘

हाच खरा मुन्नाभाई एमबीबीएस...
नागपूरकरांनी अनुभवले ‘सत्याचे प्रयोग’ : अन् लक्ष्मण गोळे बोलत गेला...
नागपूर : साधे एक पुस्तक एखाद्या गुंडाचे अख्खे आयुष्य बदलू शकते, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. मात्र मुंबईच्या गुन्हेगार विश्वातील एका कुख्यात गुंडाच्या जीवनात हा बदल घडला. ‘सत्याच्या प्रयोगा’ने लक्ष्मण गोळेसारख्या एका अट्टल गुंडाच्या हृदयात गांधी अवतरला़ अशा या गांधीची ‘आम्ही घडलो! तुम्ही ही घडा ना!’ ही प्रकट मुलाखत रविवारी प्रयास-सेवांकुर, मुंडले एज्युकेशन ट्रस्ट व चौधरी परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. दक्षिण अंबाझरी मार्गावरील ब्लार्इंड रिलिफ असोसिएशनच्या प्लॅटिनम ज्युबिली सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. प्रयास-सेवांकुरचे डॉ़ अविनाश सावजी यांनी ही मुलाखत घेतली. मुलाखतीत लक्ष्मण हा आयुष्यातील चढ-उतारासह सकारात्मक विचारांचा पैलू उलगडत गेला आणि त्याच्यातील खरा गांधी अवगत होत गेला़ वय अवघे १६ वर्षांचे. मुंबईत एक नराधम एका महिलेवर अत्याचार करीत होता. सगळे बघे जमले होते़ पण सगळे केवळ पाहण्यासाठी. ‘आई-बहीण मेली का सगळ्यांची’ असे म्हणून तिने सगळ्या बघ्यांना चेतविले़ पण मुर्दाडांच्या जगात ते कोण जिवंत राहणार? मात्र मी चेतलो़ हटकायला गेलो. पण तो मानेना़ मलाही धमकावणे सुरू केले़ आईची शिवी पडली आणि मी क्रोधित झालो़ क्षणाचा क्रोध माणसाला अपराधी बनवतो, असे सांगण्यात मात्र लक्ष्मण यावेळी विसरला नाही़ न्हाव्याच्या दुकानातील वस्तरा आणला आणि सपासप वार करून पळालो़ तर क ाय, माझ्या जागी वडील पोलिसात गेले़ म्हणून मी आत्मसमर्पण केले आणि इथून माझ्या गुन्हेगारी विश्वात प्रवेश झाला़ पुढे एकेक गडी मिळत गेला़ टोळी जमली आणि मुंबईवर अधिराज्य गाजविण्याची महत्त्वाकांक्षाही वाढत गेली़ गुन्हेगारी विश्वात नाव झाले. दबदबा निर्माण झाला. पैसा आला. सगळे घाबरू लागले. खंडणी वसुली, ब्लॅकमेलिंग व खुनाच्या प्रयत्नाचे सुमारे १९ गुन्हे दाखल झाले. तुरुंगवारी अन् वाचनाचा छंद नागपूर : प्रत्येक गुन्ह्यात तुरुंगवारी झाली़ पण वाचनाचा छंद काही सुटेना़ अवघा सातवा वर्ग शिकलेला मी गुन्हे जगतातला अस्सल ‘डिग्री होल्डर’ झालो़ प्रत्येक गुन्ह्याचे कलम बिनपाठ खडान्खडा माहीत झाले़ यासाठी मला प्रोफेसर म्हणून नोकरीची आॅफरही आली, असे गमतीने पण खरे खरे लक्ष्मण सांगत होता़ त्याचा दाखलाही त्याने यावेळी दिला़ ‘सम्राट अशोक’ पुरस्काराचा मानकरी लक्ष्मण गोळे याला महाराष्ट्र शासनाने ‘सम्राट अशोक’ पुरस्कार प्रदान करून त्याचा गौरव करण्यात आला आहे. शिवाय त्याच्या आयुष्यावर आधारित ‘लक्ष्मण गोळे’ हा हिंदी चित्रपट तयार झाला असून, तो लवकरच प्रदर्शित होत आहे़ गुन्हेगारी विश्वातून बाहेर पडल्यानंतर लक्ष्मणने विवाह केला; तेही सत्य बोलूनच. तो म्हणाला, विवाह जुळताना भावी पत्नीला सर्वकाही सत्य सांगितले़ तीही ऐकून अवाक् झाली़ पण तिला आवडले आणि ती राजी झाली़ आज लक्ष्मणला एक सत्या व दुसरी सौम्या अशा दोन मुली आहेत. तब्बल १५ वर्षे गुन्हेगारी जगतात वावरल्यानंतर गत सात वर्षांपासून तो कैद्यांना समुपदेशन करीत आहे. शिवाय भविष्यात कैद्यांसाठी तुरुंगातून सुटल्यानंतर पुनर्वसन व रोजगार प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याच्या प्रयत्नात असल्याचेही तो म्हणाला. (प्रतिनिधी)