‘ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार उड्डाणपूल’ नागरिकांसाठी खुला; नागपूरच्या वाहतुकीला मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 15:45 IST2025-09-10T15:44:04+5:302025-09-10T15:45:05+5:30

१२ ला दुसऱ्या उड्डाणपुलाचे उद्घाटन : सर्व्हिस रोडवरही सुरू होणार वाहतूक

'Gyanyogi Dr. Shrikant Jichkar Flyover' opens for citizens; A big relief to Nagpur's traffic | ‘ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार उड्डाणपूल’ नागरिकांसाठी खुला; नागपूरच्या वाहतुकीला मोठा दिलासा

'Gyanyogi Dr. Shrikant Jichkar Flyover' opens for citizens; A big relief to Nagpur's traffic

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी अमरावती रोडवर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या प्रकल्पाचा दुसरा टप्पा अखेर नागरिकांसाठी खुला होणार आहे. १२ सप्टेंबर रोजी आरटीओ चौक ते फुटाळा चौक या उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यामुळे वाडी पोलिस ठाण्यापासून गुरुद्वारापर्यंतचे ५ किमीचे अंतर केवळ ५ मिनिटांत पार करता येईल. महाराजबाग क्लबपासून सर्व्हिस रोडवरही वाहतूक सुरू होणार आहे.

या उड्डाणपुलाला 'ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार उड्डाणपूल' असे नाव देण्यात आले आहे. बोले पेट्रोल पंपाजवळून सुरू होणारा हा पूल फुटाळा चौकापर्यंत २.८४३ किमी लांबीचा असून, वाडी पोलिस ठाणे ते गुरुद्वारा हा पहिला उड्डाणपूल १.९५ किमी लांबीचा आहे. पुलावरील वाहनांसाठी वेगमर्यादा ८० किमी प्रतितास निश्चित केली असली तरी ६० किमी वेगानेही हे संपूर्ण अंतर सहज पार होऊ शकते.

सर्व्हिस रोडवरही सुरू होणार वाहतूक

आरटीओ कार्यालयासमोरील नाल्यावर स्लॅबचे काम पूर्ण झाले असून, बोले पेट्रोल पंप ते लॉ कॉलेजकडे जाणारी वाहतूक लवकरच सुरू होणार आहे. फुटाळा चौकाच्या दिशेने एक बाजूच्या सव्हिस रोडचे काम अद्याप शिल्लक आहे, तेही लवकरच पूर्ण होणार आहे. 

बांधकामात अपघात शून्य

या प्रकल्पाच्या कामाला झाडे तोडण्यास परवानगी मिळण्यात विलंब झाल्याने सुमारे वर्षभर उशीर झाला. मात्र, विशेष म्हणजे बांधकामादरम्यान कोणताही मोठा अपघात घडला नाही. पुलावर एकूण ७६६ सेग्मेंट्स बसविण्यात आले.
भरतनगर भागात एका झाडाला वाचवण्यासाठी दोन फाउंडेशनचे डिझाइन बदलण्यात आले.
तसेच लॉ कॉलेज चौकात मलेशियन तंत्रज्ञानाचा वापर करून ६५ मीटर लांबीचे, २५० टन वजनाचे ६ गर्डर उभारण्यात आले.

Web Title: 'Gyanyogi Dr. Shrikant Jichkar Flyover' opens for citizens; A big relief to Nagpur's traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.