गुरु चरण प्रीत मोरी लागी रे..!
By Admin | Updated: June 5, 2014 01:03 IST2014-06-05T01:03:54+5:302014-06-05T01:03:54+5:30
संगीतावर अपार प्रेम असणारे वैदर्भीय ख्यातनाम गायक पं. शरद सुतवणे यांना स्वरवेदतर्फे नुकतीच संगीतमय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हा कार्यक्रम हिंदी मोरभवन, सीताबर्डी येथे विदर्भ हिंदी

गुरु चरण प्रीत मोरी लागी रे..!
स्वरश्रद्धांजली : गुरुवर्य पं. शरद सुतवणे यांची आठवण
नागपूर : संगीतावर अपार प्रेम असणारे वैदर्भीय ख्यातनाम गायक पं. शरद सुतवणे यांना स्वरवेदतर्फे नुकतीच संगीतमय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हा कार्यक्रम हिंदी मोरभवन, सीताबर्डी येथे विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या सभागृहात पार पडला. पंडितजींचे शिष्य ज्येष्ठ गायिका प्रभा घुले, गायत्री कानिटकर, प्रमोदिनी क्षत्रिय, कैवल्य केजकर, रितेश तानिलवार, स्वास्तिका सोनी यांनी शास्त्रीय राग संगीतासह सुगम संगीतातील नाट्यगीत, भावगीत अशा सुमधूर गायनाने गुरुचरणी आपली भावपूर्ण स्वरांजली अर्पण केली.
प्रभा घुले या ज्येष्ठ गायिका तसेच पंडितजींच्या निष्ठावान शिष्य. त्यांनी गुरुजींच्या आवडत्या राग कलावतीसह गायनाला प्रारंभ केला. ‘मधुरात आए आए साजन..’ ही रसिल्या अर्थभावाची बंदिश तेवढय़ाच रसिलेपणाने सादर करून त्यांनी रसिकांना जिंकले. सुरीले स्वरलगाव, उत्तम दमसास आणि गायनातील समरसता यांची त्यांनी दाद घेतली. सुप्रसिद्ध गायिका गायत्री कानिटकरने राग पुरिया धनश्रीतील प्रसन्न अनुभूतीची बंदिश ‘मुश्किल करो आसान ख्वाजा मेरी..’चे सादरीकरण केले. कैवल्य केजकर या नवोदित गायकाने तयारीने सादर केलेली तोडीतील ‘ए री माई मोरी गगरीया फोरी..’ ही बंदिश तर नवोदित गायक रितेश तालिवारने सादर केलेले राग जाैनपुरीचे सादरीकरण श्रवणीय होते. यावेळी सुप्रसिद्ध गायिका प्रमोदिनी क्षत्रिय यांनी पंडितजींनी स्वरबद्ध केलेल्या ‘वाळली सगळी फुले उरला पण वास तरी..’ आणि ‘अशा घोर रात्री तू जाशी कुठे..’ आदी रचना भावपूर्णतेने सागदर केल्या. कैवल्यने ‘या भवनातील गीत पुराणे..’ गायत्रीने दादरा व ‘एकला नयनाला विषय तो झाला..’ ही लोकप्रिय नाट्यगीते सादर केली. प्रभाताईंनी ‘गुरु कृपा तारी..’ ही रचना सादर केली. स्वास्तिका सोनी या युवा गायिकेने ‘संदेस तारो ने किया दिन ढल गया..’ हे गीत मधुरतेने सादर केले. प्रभा घुले यांनी सादर केलेल्या ‘गुरुचरण प्रित मोरी लागी रे..’ या भैरवीने स्वरांजलीचे समापन केले. स्वरवेदचे संचालक रवी सातफळे - तबला, संदीप गुरमुळे - संवादिनी यांनी सुरेल सहसंगत केली. आसावरी देशपांडे यांचे निवेदन होते. प्रमोदिनी क्षत्रिय यांनी पं. सुतवणे यांच्या प्रेमळ व्यक्तित्त्वासह त्याच्या प्रगल्भ गायन प्रतिभेचा परिचय करून देत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. (प्रतिनिधी)