Gulal Mahavikas Aghadicha! Results of 127 Gram Panchayats announced | Maharashtra Gram Panchayat Election Resullts : नागपूर जिल्ह्यात गुलाल महाविकास आघाडीचा ! 

Maharashtra Gram Panchayat Election Resullts : नागपूर जिल्ह्यात गुलाल महाविकास आघाडीचा ! 

ठळक मुद्दे१२७ ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर सत्ता स्थापनेसाठी राजकीय गटांची दावेदारीनागपूर ग्रामीण, कुही आणि कामठी तालुक्यात भाजपची सरशीआजी-माजी मंत्र्यांनी गाव राखलेे; जिल्हा परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याला धक्का

जितेंद्र ढ‌वळे /लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांतील विजयानंतर नागपूर जिल्ह्यात महाविकास आघाडीने भाजपला ग्रामपंचायत निवडणुकीतही धक्का दिला आहे. नागपूर जिल्ह्यातील १२७ ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले आहेत. यात महाविकास आघाडी समर्थित पॅनलने ८४ ग्रामपंचायतमध्ये दमदार यश मिळविले आहे. भाजप समर्थित पॅनलला कामठी, नागपूर ग्रामीण आणि कुही तालुक्यात मोठे यश मिळाले. जिल्ह्यात भाजप समर्थित पॅनलचा ३६ ग्रामपंचायतमध्ये सत्तास्थापनेचा मार्ग सुकर झाला आहे. ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडी आणि भाजपकडून दावे-प्रतिदावे करण्यात आले आहे. काँग्रेसने ८३, राष्ट्रवादी काँग्रेसने २७ ग्रामपंचायतवर स्पष्ट बहुमत मिळाल्याचा दावा केला आहे. इकडे भाजपने ६३ ग्रामपंचायतवर बहुमत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. सरपंच पदाच्या निवडणुकीनंतर राजकीय पक्षांचे दावे किती खरे, किती खोटे हे स्पष्ट होईल.

जिल्ह्यात १३० ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. यात कळमेश्वर तालुक्यातील सोनपूर (आदासा) ग्रामपंचायत तर सावनेर तालुक्यातील जटामखोरा ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध झाली आहे. यासोबतच कुही तालुक्यातील देवळी कला ग्रामपंचायतची निवडणूक मतदार यादीतील घोळामुळे रद्द करण्यात आली होती. त्यामुळे १२७ ग्रामपंचायतसाठी निवडणूक घेण्यात आली. तीत ३,१७,२४७ पैकी २,२३,५७९ (७४.८९ टक्के) मतदारांनी गावकारभाऱ्यांची निवड केली. काटोल आणि नरखेड तालुक्यात २० ग्रामपंचायतसाठी राष्ट्रवादीचे नेते गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या दोन्ही तालुक्यात महाविकास आघाडीला १६ ग्रामपंचायतमध्ये यश मिळाले आहे.
सावनेर तालुक्यातील पाटणसावंगी ग्रामपंचायत यावेळीही राखण्यात राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांना यश आले. येथे १७ पैकी ३ जागा बिनविरोध झाल्या होत्या. १४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस समर्थित पॅनलला १३, तर भाजप समर्थित पॅनलला एका जागेवर यश मिळाले.

कामठी तालुक्यातील कोराडी ग्रामपंचायत राखण्यात भाजपचे महामंत्री, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना यश आले. येथे भाजप समर्थित आदर्श ग्राम निर्माण आघाडीचा १७ पैकी १२ जागांवर, तर महाविकास आघाडीचा पाच जागांवर विजय झाला. गतवेळी येथे भाजप समर्थित पॅनलने १७ पैकी १७ जागांवर विजय मिळविला होता. यावेळी कोराडीत काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य नाना कंभाले यांनी भाजपला काहीसा धक्का दिला आहे.
कामठी तालुक्यात महालगाव ग्रामपंचायतच्या निकालात काँग्रेस समर्थित गटाचे ४, भाजप समर्थित गटाचे ३, तर तीन अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. येथे जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते अनिल निधान यांना काँग्रेसने धक्का दिला आहे.
काटोल तालुक्यातील ३ ग्रामपंचायतपैकी माळेगाव ग्रामपंचायतमध्ये महाविकास आघाडी (राष्ट्रवादीला) ला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. येथे भोरगड आणि खंडाळा या दोन ग्रामपंचायतवर महाविकास आघाडी आणि भाजपने दावा केला आहे. नरखेड तालुक्यातील १७ पैकी १५ ग्रामपंचायतवर महाविकास आघाडी (राष्ट्रवादी), तर दोन ग्रामपंचायतमध्ये भाजप समर्थित पॅनलला यश मिळाले आहे. सावनेर तालुक्यात १२ पैकी ११ ही ग्रामपंचायतवर महाविकास आघाडीला (काँग्रेस) बहुमत मिळाले आहे. जटामखोरा ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध झाली होती.
कळमेश्वर तालुक्यात पाच पैकी चार ग्रामपंचायतमध्ये महाविकास आघाडी (काँग्रेस)ला यश मिळाले आहे. येथे सोनपूर (आदासा) ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध झाली. रामटेक तालुक्यात ९ पैकी ८ ग्रामपंचायतमध्ये महाविकास आघाडीला (काँग्रेस, शिवसेना) यश मिळाले आहे. येथे एका ग्रामपंचायतमध्ये भाजप समर्थित पॅनलला बहुमत मिळाले आहे.
पाराशिवनी तालुक्यात १० पैकी १० ग्रामपंचायतवर महाविकास आघाडीला यश मिळाले आहे. मौदा तालुक्यातील ७ पैकी ४ ग्रामपंचायतमध्ये महाविकास आघाडी, तर ३ ग्रामपंचायतमध्ये भाजप समर्थित गटाला बहुमत मिळाले आहे. कामठी तालुक्यात ९ पैकी ६ ग्रामपंचायतमध्ये भाजप समर्थित गटाला, तर दोन ग्रामपंचायतमध्ये महाविकास आघाडी समर्थित गटाला यश मिळाले आहे. येथे एका ग्रामपंचायतमध्ये कुणालाही बहुमत मिळाले नाही.

उमरेड तालुक्यात १४ पैकी १० ग्रामपंचायतमध्ये महाविकास आघाडी (काँग्रेस), तर ४ ग्रामपंचायतमध्ये भाजप समर्थित गटाला यश मिळाले आहे.
भिवापूर तालुक्यात ३ पैकी दोन ग्रामपंचायतमध्ये महाविकास आघाडी (काँग्रेस) समर्थित गटाला बहुमत मिळाले, तर मोखाबर्डी ग्रामपंचायतमध्ये भाजप समर्थित गट नंबर १ वर राहिला आहे. तालुक्याचे या ग्रामपंचायतीच्या निकालाकडे लागले होते. येथे पंचायत समितीच्या सभापती ममता शेंडे यांचे सासरे तुळशीदास शेंडे यांचा भाजप समर्थित पॅनेलचे रोषण गायधने यांनी पराभव केला.

कुही तालुक्यात २४ पैकी १४ ग्रामपंचायतमध्ये भाजप समर्थित गट, तर १० ग्रामपंचायतमध्ये महाविकास आघाडीला (काँग्रेस) बहुमत मिळाले. जि.प. निवडणुकीतही काँग्रेसला कुही तालुक्यात चांगली कामगिरी करता आली नव्हती. नागपूर ग्रामीण तालुक्यात ११ पैकी ५ ग्रामपंचायतमध्ये भाजप समर्थित गट, महाविकास आघाडी (४), वंचित बहुजन आघाडी (१), तर एका ग्रामपंचायतमध्ये अपक्षांनी बाजी मारली. हिंगणा तालुक्यात ५ पैकी ३ ग्रामपंचायतमध्ये महाविकास आघाडी, तर एका ग्रामपंचायतमध्ये भाजप समर्थित गटाला यश मिळाले. येथे एका ग्रामपंचायतमध्ये कुणालाही बहुमत नाही.


नेते काय म्हणतात...
पदवीधर मतदार संघानंतर आता ग्रामपंचायतच्या निवडणुका एकत्र येत लढल्याने महाविकास आघाडीला जिल्ह्यात मोठे यश मिळाले आहे. जिल्हा परिषद आणि ११ पं.स.वर काँग्रेसची सत्ता स्थापन झाल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले आहे. जिल्ह्यात ८३ ग्रा.पं.मध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.

- राजेंद्र मुळक, अध्यक्ष, नागपूर जिल्हा (ग्रामीण) काँग्रेस कमिटी
---
जिल्ह्यात ६५ ग्रा.पं.मध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. यासोबतच ८ ग्रा.पं.वर अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन केली जाणार आहे. एकूण ११९६ सदस्यांपैकी भाजपाचे ६५२ ग्रा.पं.सदस्य विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीला जनतेने स्पष्टपणे नाकारले आहे.
- अरविंद गजभिये, जिल्हा भाजपा अध्यक्ष
-----
ग्रा.पं.निवडणुकीत जिल्ह्यात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे. २७ ग्रा.पं.मध्ये राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. यासोबतच २९ ग्रा.पं.मध्ये राष्ट्रवादी समर्थित गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत.
- बाबा गुजर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस


जिल्ह्यात शिवसेना समर्थित पॅनेलचे २२५ उमेदवार विजयी झाले आहे. २२ ग्रा.पं.मध्ये सेनेला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. सरपंच पदाच्या निवडणुकीत जिल्ह्यात यापेक्षाही चित्र वेगळे राहील. बहुतांश ग्रा.पं.वर महाविकास आघाडीचे सरपंच विजयी होतील. ग्राम विकासासाठी महाविकास आघाडी हा एकमेव पर्याय आहे. 
- संदीप इटकेलवार, जिल्हा प्रमुख, शिवसेना

Web Title: Gulal Mahavikas Aghadicha! Results of 127 Gram Panchayats announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.