गुजरातचे निकाल हा भाजपसाठी इशारा; राधाकृष्ण विखे पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 18:58 IST2017-12-18T18:56:20+5:302017-12-18T18:58:35+5:30
पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांनी काँग्रेसमुक्त भारताची वल्गना केली होती. पण त्यांच्या गृहराज्यातच भाजपला पुन्हा सत्ता स्थापण्याची निसटती संधी मिळाली, हा मतदारांचा कौल भाजपने लक्षात घेतला पाहिजे.

गुजरातचे निकाल हा भाजपसाठी इशारा; राधाकृष्ण विखे पाटील
आॅनलाईन लोकमत
नागपूर :
पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांनी काँग्रेसमुक्त भारताची वल्गना केली होती. पण त्यांच्या गृहराज्यातच भाजपला पुन्हा सत्ता स्थापण्याची निसटती संधी मिळाली, हा मतदारांचा कौल भाजपने लक्षात घेतला पाहिजे. हा जनतेचा इशारा आहे, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीत निकालांबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा काँग्रेसच्या किमान १६ जागा वाढतांना दिसत आहेत. काँग्रेसला झालेले मतदान ३८ टक्क््यांवरून ४१.५ टकक्यांवर गेले आहे. त्यामुळे पक्षाच्या कामगिरीत भरीव सुधारणा आहे आणि यामध्ये काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाचे मोठे श्रेय आहे.
गुजरातेत भाजपची प्रचंड दहशत असताना खा. राहुल गांधी यांनी संपूर्ण गुजरात पालथा घातला. जनतेने त्यांना साथ दिली. कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. काँग्रेसची संघटना मजबूत झाली आणि संपूर्ण देशात याचा सकारात्मक परिणाम झाला. त्यामुळे भलेही गुजरातमध्ये सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली नसेल, पण संपूर्ण देशातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. त्याचे अनुकूल परिणाम आपल्याला नजीकच्या काळात दिसून येतील,असेही विरोधी पक्षनेते म्हणाले.
या निकालाने भाजपविरोधात नाराजीची लाट तीव्र होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपला मिळालेल्या जागा आणि मतदान मोठ्या फरकाने कमी झाल्याकडेही विखे पाटील लक्ष वेधले.