पाहुणा बनून आला आणि अब्रू लुटून गेला; आईवडिलांना कळलेच नाही...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 08:00 IST2020-07-06T07:59:17+5:302020-07-06T08:00:02+5:30
घरी पाहुणा म्हणून आलेल्या नराधमाने रोज रात्री केले तिच्यासोबत अश्लील चाळे..

पाहुणा बनून आला आणि अब्रू लुटून गेला; आईवडिलांना कळलेच नाही...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाहुणा बनून आलेल्या जयपूरच्या एका नातेवाईकाने अल्पवयीन मुलीवर तब्बल पाच दिवस बलात्कार केला. पीडित मुलीने आधी मैत्रिणींना ही माहिती दिली आणि त्यानंतर पालकांनी हिंमत दिल्यामुळे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. तहसील पोलिसांनी याप्रकरणी शिवा रमेशचंद्र शर्मा (वय २७) नामक तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
पीडित मुलगी १७ वर्षांची असून बारावीत शिकते. आरोपी शर्मा राजस्थानमधील जयपूरचा रहिवासी असून, तो २१ जूनला नागपुरात पीडिताच्या घरी आला होता. घर छोटेसे असल्यामुळे तिच्या आईने रात्री त्याला तिच्या शेजारी झोपण्यास सांगितले. त्या रात्री आरोपीने पीडितेसोबत अश्लील चाळे केले. पीडिता जागी झाली असता आरोपीने झोपेचे सोंग घेतले. झोपेत हात लागला, असे समजून ती गप्प राहिली. दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा त्याने घरातील मंडळी गाढ झोपेत असताना तिच्यावर अत्याचार केला. तिने ओरडण्याचा प्रयत्न केला असता तिचे तोंड दाबून तिला बदनामीचा धाक दाखवला. त्यामुळे पीडिता गप्प बसली.
दुसऱ्या दिवशी पीडितेने त्याच्याजवळ झोपण्यास नकार देऊन आईला या गैरप्रकाराचे संकेत दिले. मात्र आईने नातेवाईक असल्यामुळे त्याच्याजवळ झोपण्यास काही हरकत नाही, असे सांगून तिला गप्प केले. परिणामी पुढचे पाच दिवस आरोपी तिच्यावर रोज अत्याचार करू लागला. २६ जूनला तो निघून गेला. त्यानंतर हादरलेल्या मुलीने आपल्या मित्र-मैत्रिणींना आपबिती सांगितली. त्याने ओरबडण्याच्या आणि चावल्याच्याही जखमा दाखवल्या. त्यामुळे मित्र-मैत्रिणींनी तिच्या आई-वडिलांना ही बाब सांगितली. आई-वडिलांनी बराच विचार केल्यानंतर तिला तहसील ठाण्यात नेले. त्यावरून शनिवारी रात्री याप्रकरणी आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस पथक जयपूरला जाणार
आरोपी शर्मा हा विवाहित असून त्याला दोन मुले असल्याची माहिती आहे. त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी तहसील पोलिसांचे पथक लवकरच जयपूरला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.