ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा घेराव
By Admin | Updated: September 28, 2016 03:25 IST2016-09-28T03:25:44+5:302016-09-28T03:25:44+5:30
स्थानिक वॉर्ड क्रमांक - ३ मधील ढिवरपुरा भागात मृत डुकरांची दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे.

ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा घेराव
केळवदवासीयांमध्ये रोष : दुर्गंधीतून मुक्ती देण्याची मागणी
केळवद : स्थानिक वॉर्ड क्रमांक - ३ मधील ढिवरपुरा भागात मृत डुकरांची दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. मागील आठ दिवसांपासून ग्रामपंचायत प्रशासन ही समस्या सोडविण्यास टाळाटाळ करीत असल्याने संतप्त नागरिकांनी मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा नेला. यावेळी संतप्त नागरिकांनी तब्बल तीन तास ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना घेराव करीत ही समस्या सोडविण्याची मागणी रेटून धरली होती. यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला नव्हता.
डुकरांमुळे गावालगतच्या शेतांमधील पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले. यातून मार्ग काढण्यासाठी या डुकरांचा कायमचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने काहींनी डुकरांना जीवे मारले. मात्र, त्या मृत डुकरांची वेळीच विल्हेवाट लावली नाही. त्यामुळे मृत डुकरांची दुर्गंधी सुटली आणि वॉर्ड क्रमांक - ३ मधील नागरिकांचे जगणे कठीण झाले. या डुकरांच्या मालकांनी मृत डुकरांची विल्हेवाट लावण्यास नकार दिल्याने नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रार केली.
प्रशासन या तक्रारीची दखल घेत नसल्याचे लक्षात येताच वॉर्ड क्रमांक - ३ मधील त्रस्त नागरिकांनी सायकलवर लाऊडस्पीकर बांधून विविध घोषणा देत ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा नेला.
मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. गावातील विविध मार्गाने भ्रमण करीत तसेच विविध घोषणा देत हा मोर्चा ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात पोहोचला. नागरिकांच्या भावना विचारात घेता सरपंच सीमा मदने, ग्रामसेवक ई. टी. बांबल यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य कार्यालयात हजर झाले. या मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. हा मोर्चा ग्रामपंचायत कार्यालयावर पोहोचताच नागरिकांनी सरपंच सीमा मदने यांच्या समक्ष ही समस्या रेटून धरली. तीन तासांच्या चर्चेनंतर ग्रामसेवक ई. टी. बांबल यांनी ही समस्या सोडविण्याचे नागरिकांना लेखी आश्वासन दिले. त्यानंतर नागरिक शांत झाले.
या मोर्चात अमोल खांडेकर, नंदू ढोबळे, मंगेश उराडे, किशोर दगडे, कलावती निकोसे, सुमन कुकडे, हेमा मदने, शोभा कळसाईत, छाया तवले, अर्चना बावणे, सावित्री बावणे, हिरा सुरजुसे, सावित्री कोल्हे, कमला दगडे, पौर्णिमा दगडे, अल्का मदने, कविता सौदागर, रुचिता मारबते, अल्का शेंडे, कांता अंबडकर, सविता मारबते, सविता निकोसे यांच्यासह पुरुष व महिला सहभागी झाल्या होत्या. (वार्ताहर)