छत्रपती उड्डाण पूल तुटल्याचे दु:ख
By Admin | Updated: November 17, 2016 02:52 IST2016-11-17T02:52:08+5:302016-11-17T02:52:08+5:30
विशेष महत्त्वाच्या व्यक्तींना विमानतळापासून विनाअडथळा प्रवास करता यावा,

छत्रपती उड्डाण पूल तुटल्याचे दु:ख
सदाशिव माने यांची प्रतिक्रिया : छत्रपती उड्डाण पुलाचे बांधकाम
नागपूर : विशेष महत्त्वाच्या व्यक्तींना विमानतळापासून विनाअडथळा प्रवास करता यावा, हा उद्देश ठेवून विशेष परिश्रमाने आणि नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून १८ वर्षांपूर्वी बांधलेला छत्रपती उड्डाण पूल तोडताना दु:ख आणि मनाला वेदना होत असल्याची प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता (निवृत्त) सदाशिव माने यांनी लोकमतशी बोलताना दिली. त्या काळात हा विदर्भातील पहिला उड्डाण पूल होता. बांधकामासाठी ५.२५ कोटींचा खर्च आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पहिल्यांदा मशरुम आकाराचा पिलर
माने म्हणाले, त्यावेळी मिहान प्रकल्प उभारण्याचा विचार होता. मिहानमधील वाहतूक आणि हलकी वाहने सुरळीत जावीत, हा सुद्धा उद्देश होता. त्यावेळी प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते. मशरुम आकाराचा पिलर हे तंत्रज्ञानाचे मोठे स्वरूप आहे. हे पिलर आजही ‘जैसे थे’ असून जागेवरच तयार करण्यात आले. खापरीजवळील यार्डमध्ये २० मीटरचे गर्डर तयार करण्यात येत होते. ते नंतर विशेष तंत्रज्ञानाच्या आधारे पिलरवर टाकण्यात येत होते. त्यावेळी बांधकाम खात्याची संपूर्ण चमू कामावर लक्ष द्यायची. यार्डमध्ये काँक्रिटला मजबूती येण्यासाठी पाण्याऐवजी वाफेचा उपयोग करण्यात आला. त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणे सोपे व्हायचे. प्रत्येक पिलरला क्रॉस गर्डरने जोडले आहे. त्यामुळे १०० मीटरचा गर्डर अखंड वाटतो. पुलाच्या डिझाईनला एक वर्ष लागल्याचे माने म्हणाले.
झिरो माईल्सजवळ पिलर उभा
छत्रपती उड्डाण पुलासाठी बांधण्यात आलेला पिलर मशरुम आकाराचा आहे. पूर्वी या पिलरचे चार डिझाईन तयार करण्यात आले, पण पाचव्या पिलरच्या डिझाईनला मंजुरी देण्यात आली. या पिलरला कुठेही जोड नाही. तो अखंड उभा आहे. मुख्य अभियंते देवदत्त मराठे यांनी पिलरचे डिझाईन तयार केले. हा पूल एवढा मजबूत आहे की, १०० वर्षे काहीही होणार नाही. पुलाची निर्मिती आम्ही केली आहे, पण तुटताना दु:ख होत असल्याचे माने यांनी सांगितले.
युती सरकारच्या काळात बांधकाम
युती सरकारच्या काळात नितीन गडकरी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असताना पुलाचे बांधकाम झाले. आॅगस्ट १९९७ मध्ये बांधकाम सुरू झाले आणि नोव्हेंबर २००० मध्ये पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पूल एकूण ४०० मीटरचा असून, प्रत्येक पुलाचे बांधकाम १०० मीटरचे आहे आणि दोन्ही बाजूला अॅप्रोच रस्ता ३०० मीटर आहे. १०० मीटर पूल पाच टप्प्यात अर्थात १०० मीटर गर्डरने निर्मिती करण्यात आली. २० मीटरच्या स्पॅनमध्ये १४ गर्डर टाकण्यात आले आणि त्यांना तारेने दाब देऊन बांधण्यात आले.