मेट्रोचे हरित पाऊल : मेट्रो स्टेशनवर सांडपाण्याचा पुन्हा उपयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 22:47 IST2020-01-22T22:44:57+5:302020-01-22T22:47:07+5:30
महामेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पात हरित पाऊल टाकत सांडपाण्याच्या पुन्हा उपयोगासाठी बायो-डायजेस्टर टॅन्क आणि अनॅरोबिक मायक्रोबियल इनोकुलम (एएमआय) प्रणाली अमलात आणली आहे.

मेट्रोचे हरित पाऊल : मेट्रो स्टेशनवर सांडपाण्याचा पुन्हा उपयोग
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महामेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पात हरित पाऊल टाकत सांडपाण्याच्या पुन्हा उपयोगासाठी बायो-डायजेस्टर टॅन्क आणि अनॅरोबिक मायक्रोबियल इनोकुलम (एएमआय) प्रणाली अमलात आणली आहे. यात डीआरडीओ पेटंट टेक्नॉलॉजीच्या माध्यमाने विशेष जीवाणूंच्या साहाय्याने सांडपाण्याचे पूर्णपणे स्वच्छ पाण्यात रूपांतरण होते. प्रायोगिक स्तरावर नागपूर मेट्रोच्या रिच-१ मार्गावरील खापरी, न्यू-एअरपोर्ट, साऊथ एअरपोर्ट या तीन स्टेशनवर सध्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा उपयोगात आणले जात आहे.
एनएमआरपीने काही अद्यावत तंत्रज्ञासह केवळ बायो-डायजेस्टर आणि रीड बेड तंत्रज्ञानाचा यासाठी वापर करीत आहेत. हे तंत्रज्ञान प्रामुख्याने स्टेशन आणि डेपोमध्ये वापरले जाते. या प्रक्रियेमुळे प्रत्येक वेळेस नव्याने लागणाऱ्या पाण्याची गरज राहत नाही. त्यामुळे ३० टक्के म्हणजेच प्रत्येक स्टेशनवर दरदिवशी सुमारे ८०० ते ९०० लिटर पाण्याची बचत होत आहे. मोजक्या जागेत कमीत कमी खर्चात पारंपारिक पद्धतीने वॉटर रिसायकलिंगची प्रक्रिया राबविली जाते. या प्रक्रियेमुळे इतरत्र कुठेही सांडपाणी जमा राहण्याची शक्यता नाही. यासाठी विजेची गरज नसून यामुळे पाण्यासह खर्चात बचत होते.
झिरो लिक्विड डिस्चार्जची पर्यावरणविषयक बांधिलकी जपण्यासाठी महामेट्रोने नागपूर मेट्रो प्रकल्पात या तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. नागपूर मेट्रो प्रकल्पात सदर प्रक्रिया राबविण्यासाठी महामेट्रो आणि डीआरडीओदरम्यान सामंजस्य करार करण्यात आला होता. ही प्रक्रिया राबविण्यासाठी आवश्यक सर्व तपासण्या महामेट्रोतर्फे आल्या आहेत. तर काही महत्त्वाच्या चाचण्या प्रयोगशाळेमध्ये करून प्रत्यक्ष अमलात आणली आहे. यामुळे नेहमीसाठी कमीत कमी खर्चात ही प्रक्रिया राबविणे सहज शक्य झाले आहे. पुढील काळात इतर स्टेशन आणि कार्यालयातदेखील या प्रणालीचा वापर होणार आहे.