वलणीत 'दहेगाव-गोवरी' कोळसा प्रकल्पाला हिरवा कंदील; ५० वर्षांचा भूमिगत खाणकाम आराखडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 15:20 IST2025-09-11T15:18:34+5:302025-09-11T15:20:35+5:30
Nagpur : धनबाद येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मायनिंग अँड फ्युएल रिसर्चच्या अभ्यासानुसार, या प्रकल्पाचा पर्यावरणीय परिणाम कमीत कमी असेल.

Green light given to 'Dahegaon-Gowri' coal project in Valani; 50-year underground mining plan
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील वलणी परिसरातील प्रस्तावित दहेगाव-गोवरी कोळसा ब्लॉक भूमिगत खाणकाम प्रकल्पासाठी पर्यावरणीय जनसुनावणी बुधवारी पूर्ण झाली. या प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा दावा कंपनीतर्फे करण्यात आला.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे अंबुजा सिमेंट प्रा. लिमिटेडकडून वलणीच्या खाण परिसरात बुधवारी ही जनसुनावणी घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, एमपीसीबीच्या प्रादेशिक अधिकारी हेमा देशपांडे, उपप्रादेशिक अधिकारी धनश्री पाटील यांच्या उपस्थितीत ही जनसुनावणी पार पडली. कंपनीतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार एकूण १,५६२ हेक्टर क्षेत्रफळांपैकी केवळ २४.०५ हेक्टर क्षेत्रफळ खाणकाम आणि खाणकाम हरित पट्टा विकासासाठी वापरला जाईल. भूमिगत असल्याने पुनर्वसनाची आवश्यकता राहणार नाही किंवा पृष्ठभागावर कोणत्याही प्रकारचे भूस्खलन होणार नाही. धनबाद येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मायनिंग अँड फ्युएल रिसर्चच्या अभ्यासानुसार, या प्रकल्पाचा पर्यावरणीय परिणाम कमीत कमी असेल.
या प्रकल्पामुळे स्थानिक अर्थव्यवस्थाही बळकट होईल. अंदाजे ७०० प्रत्यक्ष आणि १,६०० अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील, ज्यामुळे स्थानिक लोकांना उपजीविकेच्या संधी उपलब्ध होतील. बांधकाम कालावधीत ट्रॅक्टर, उत्खनन यंत्र आणि इतर वाहतूक सेवांद्वारेदेखील रोजगार निर्माण होईल.
प्रकल्पाची उत्पादन क्षमता दरवर्षी १.० दशलक्ष टन निश्चित करण्यात आली आहे. खाण क्षेत्रात एकूण १८९.७४ दशलक्ष टन भूगर्भीय साठा आहे, ज्यापैकी ७९.५३७ दशलक्ष टन खाणकाम करण्यायोग्य आहे आणि ४६.१९ दशलक्ष टन काढता येण्याजोगे आहे. खाणकामाची किमान खोली १०० मीटर आणि कमाल खोली ५९० मीटर निश्चित करण्यात आली आहे. प्रकल्पाचे आयुष्य बांधकाम कालावधीसह ५० वर्षे असेल.
२४ सप्टेंबर २०२४ रोजी खाणकाम आराखडा मंजूर करण्यात आला. ११ एप्रिल २०२५ रोजी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने टीओआर पत्र जारी केले आणि १६ मे २०२५ रोजी एमपीसीबीने तयार केलेला पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन अहवाल सादर करण्यात आला.
पर्यावरण संरक्षणाअंतर्गत कंपनीतर्फे ५,००० रोपे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. स्थानिक प्रजातींना प्राधान्य दिले जाईल. भूगर्भातील खाणकामात पाण्याचा पुनर्वापर केला जाईल आणि उर्वरित पाणी नैसर्गिक जलाशयांमध्ये सोडण्यापूर्वी स्वच्छ केले जाईल, जेणेकरून आसपासचे ग्रामस्थ शेतीसाठी त्याचा वापर करू शकतील. ध्वनी आणि धूळ नियंत्रण, हरित पट्टा विकास आणि पावसाचे पाणी साठवण यासारखे पर्यावरणीय उपाय राबविले जातील. सीएसआर उपक्रमांमुळे शिक्षण, आरोग्य, ग्रामीण पायाभूत सुविधा, कौशल्य विकास आणि महिला स्वयंरोजगाराला प्रोत्साहन मिळेल. या प्रकल्पांतर्गत स्थानिक शाळा आणि अंगणवाडी केंद्रांसाठी पायाभूत सुविधांचा विकास, विशेष शिक्षण साधने, फिरते वैद्यकीय युनिट आणि आरोग्य शिबिरे चालवणे, ग्रामीण रस्त्यांवर सौर पथदिवे, जलाशयांचा आणि सामुदायिक सुविधांचा विकास केला जाईल, असा विश्वास कंपनीतर्फे यावेळी देण्यात आला.