लोकमत न्यूज नेटवर्कजलालखेडा : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने या नुकसानीचे पंचनामे करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु हे आश्वासन फोल ठरले असून दिवाळीनंतर म्हणजेच गुरुवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, कोणत्या निकषानुसार अनुदानाची रक्कम जमा झाली हेच शेतकऱ्यांना समजेनासे झाले आहे.
नरखेड तालुक्यातील पेठेमुक्तापूर शिवारात अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. येथील शेतकऱ्यांचे पंचनामे करणाऱ्या ग्रामसेविका श्वेता खांडे यांनी पंचनामे करण्यासाठी पैशाची मागणी केल्याचे समोर आले आहे. काही शेतकऱ्यांनी मागितलेली रक्कम दिली, तर काहींनी नकार दिला. ज्यांनी पैसे दिले, त्यांच्या खात्यात शासनाच्या निकषानुसार अनुदान जमा झाले, मात्र ज्यांनी पैसे देण्यास नकार दिला, त्यांच्या खात्यात अत्यल्प रक्कम जमा करण्यात आली, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
या प्रकरणाची पेठेमुक्तापूर येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली असून, शुक्रवारी नरखेड येथे झालेल्या भेटीत संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी व कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, ग्रामपंचायत पेठेमुक्तापूर येथील संगणक ऑपरेटर आणि शेतकरी यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये ऑपरेटर म्हणतो, तुझ्या खात्यात ६ हजार ५०० रुपये जमा झाले असून त्यातील २ हजार तू ठेव आणि उरलेले ४ हजार ५०० रुपये मॅडमला दे, कारण मॅडमचा फोन आला होता, असे संभाषण ऐकायला मिळते.
शेतकऱ्यांची तक्रार आणि मागणी
स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले की, पंचनामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पैशाची मागणी केली नसती तर अनेक शेतकऱ्यांना शासनाच्या नियमांनुसार संपूर्ण अनुदान मिळाले असते. परंतु, ज्या शेतकऱ्यांनी पैसे दिले नाहीत, त्यांना अन्याय सहन करावा लागला. याबाबत शेतकरी नीलेश ढोरे म्हणाले, "झालेला सर्वे चुकीचा असून ज्या शेतकऱ्यांनी मागितल्याप्रमाणे पैसे दिले, त्यांनाच शासनाच्या निकषानुसार अनुदान मिळाले. इतरांना अन्याय झाला आहे. पैशाची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करावी व पुन्हा पंचनामे करावेत.
"मागील वर्षीही असाच प्रकार झाला होता. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती, पण कारवाई झाली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांची हिंमत वाढली असून यंदाही तोच प्रकार घडला आहे. यावेळी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असून, कार्यवाही न झाल्यास मोठे आंदोलन उभारू."- सागर दुधाने, जिल्हाध्यक्ष, क्रांतिकारी शेतकरी संघटना
Web Summary : A village official in Narkhed is accused of demanding money for assessing crop damage. Farmers allege those who paid received adequate compensation, while others did not. An audio clip supports the accusations, prompting calls for suspension and re-evaluation.
Web Summary : नरखेड़ में एक ग्राम सेवक पर फसल क्षति के आकलन के लिए पैसे मांगने का आरोप है। किसानों का आरोप है कि जिन्होंने भुगतान किया उन्हें पर्याप्त मुआवजा मिला, जबकि अन्य को नहीं। एक ऑडियो क्लिप आरोपों का समर्थन करती है, जिससे निलंबन और पुनर्मूल्यांकन की मांग हो रही है।