नागपुरातील कळमन्यात धान्य भिजले, शेतकरी व व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 10:59 IST2021-02-18T10:58:07+5:302021-02-18T10:59:10+5:30
Nagpur News कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य बाजारात १६ फेब्रुवारीला आलेल्या अवकाळी पावसाने, खुल्या परिसरात ठेवलेले शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे धान्य भिजल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

नागपुरातील कळमन्यात धान्य भिजले, शेतकरी व व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य बाजारात १६ फेब्रुवारीला आलेल्या अवकाळी पावसाने, खुल्या परिसरात ठेवलेले शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे धान्य भिजल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक आणि अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
हवामान खात्याने तीन दिवस पाऊस येण्याचा अंदाज व्यक्त केल्यानंतर बाजार समितीने धान्य खळ्यात ठेवण्याचे आवाहन केले होते. पण सर्व खळे धान्याने भरल्याने त्यात अतिरिक्त माल ठेवणे शक्य नव्हते. त्यामुळे बाहेर ठेवलेले धान्य भिजले. अशा धान्याची किंमत कमी होऊन व्यापारी खरेदी करण्यास धजावत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे.
कळमना धान्य अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष अतुल सेनाड म्हणाले, वर्षभरात १५ पेक्षा जास्त वेळ अवकाळी पाऊस येतो. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे परिसरातील धान्य भिजून लाखो रुपयांचे नुकसान होते. सध्या बाजारात चना, तूर, गहू आणि सोयाबीनची आवक आहे. त्यातच चना आणि तुरीची दररोज ५ ते ६ हजारांपेक्षा जास्त पोती येत आहेत. कळमन्यात धान्यासाठी १२ खळे असून दोन खळ्यांमध्ये ४० फुटांचा रोड आहे. शेतकऱ्यांचे धान्य नेहमीच भिजत असल्याने असोसिएशन बाजार समितीकडे दोन खळ्यांच्या मधल्या जागेत पारदर्शक डोम उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून करीत आहे. पण समिती याकडे दुर्लक्ष करीत आहे. पारदर्शक शीटांचे डोम उभारल्यास ऊन येईल आणि धान्य भिजणार नाही. याकरिता जवळपास दीड कोटींचा खर्च येणार आहे. असाच प्रयोग औरंगाबाद, जालना आणि अमरावती बाजार समितीत करण्यात आला आहे. ही माहिती असतानाही बाजार समिती डोम उभारण्यास तयार नाही. वर्षभरात अवकाळी पावसाने १५ ते २० वेळा परिसरात धान्य भिजल्याच्या घटना घडतात. त्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. आता प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावी, अशी मागणी सेनाड यांनी केली आहे.