शासन म्हणते रबी हंगामात पीक उत्तम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 23:48 IST2019-04-19T23:47:00+5:302019-04-19T23:48:26+5:30
खरीपानंतर पाण्याअभावी रबी हंगामालाही फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु शासन मात्र आलबेल असल्याचे सांगते. कारण रबी हंगामात एकाही गावाची पैसेवारी ५० पेक्षा कमी नसल्याची नोंद आहे. म्हणून प्रशासनानुसार रबीतील पीक परिस्थिती उत्तम आहे.

शासन म्हणते रबी हंगामात पीक उत्तम
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खरीपानंतर पाण्याअभावी रबी हंगामालाही फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु शासन मात्र आलबेल असल्याचे सांगते. कारण रबी हंगामात एकाही गावाची पैसेवारी ५० पेक्षा कमी नसल्याची नोंद आहे. म्हणून प्रशासनानुसार रबीतील पीक परिस्थिती उत्तम आहे.
मागील वर्षी कमी पावसामुळे खरीप पिकांवर परिणाम झाला. उत्पादनात घट झाली. शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. काही शेतकऱ्यांच्या खात्यात ही मदत जमाही झाली. मात्र अनेक शेतकरी यापासून वंचित आहेत. नदी, धरणात कमी पाणी असल्याने रबी पिकांसाठी शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळाले नाही. यामुळे पाहिजे त्या प्रमाणात फायदा झाला नसल्याचे सांगण्यात येते. अनेक शेतकऱ्यांनी तर रबीत पीकच घेतले नसल्याची माहिती आहे. पिकांना मिळालेला भावही समाधानकारक नसल्याची ओरड होत आहे. असे असताना शासन दरबारी मात्र सर्व आलबेल असल्याचे चित्र आहे. नागपूर विभागात १६६ गावांमध्ये रबीचे पीक घेण्यात येते. यंदा फक्त ९८ गावांमध्ये रबीचे पीक घेण्यात आले. या गावांमध्ये पैसेवारी ५० पेक्षा जास्त दर्शविण्यात आली आहे. म्हणजे पीक परिस्थिती उत्तम आहे. ६८ गावांमध्ये यंदा पीकच घेण्यात आले नाही. यात सर्वाधिक ६४ गाव गडचिरोली जिल्ह्यातील आहेत तर चार गाव भंडारा जिल्ह्यातील आहेत. पाणी नसल्याने पीक घेण्यात आले नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.