राजकीय मेळ्यातील संवादासाठी सरकारी यंत्रणा सज्ज; जुनाट व्यवस्थेला फाटा, नव्या व्यवस्थेची कास
By नरेश डोंगरे | Updated: November 26, 2023 20:08 IST2023-11-26T20:07:37+5:302023-11-26T20:08:16+5:30
राजकीय स्थितीच्या अनुषंगाने सध्या राज्यातील राजकीय 'संवाद बिघडला' असून तो 'वारंवार वादाचे रूप' धारण करीत आहे. परिणामी सध्या थंडीच्या दिवसात राज्यातील राजकीय तापमान वाढल्याचे भासत आहे.

राजकीय मेळ्यातील संवादासाठी सरकारी यंत्रणा सज्ज; जुनाट व्यवस्थेला फाटा, नव्या व्यवस्थेची कास
नागपूर : डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून पुढे दोन आठवड्यांसाठी भरणाऱ्या राजकीय मेळ्यातील 'संवाद' सुस्पष्ट राहावा, यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज झाली आहे. या पार्श्वभूमीवर, पारंपारिक आणि जुनाट व्यवस्थेला फाटा देण्यात आला असून, नव्या व्यवस्थेची कास धरण्यात आली आहे.
राजकीय स्थितीच्या अनुषंगाने सध्या राज्यातील राजकीय 'संवाद बिघडला' असून तो 'वारंवार वादाचे रूप' धारण करीत आहे. परिणामी सध्या थंडीच्या दिवसात राज्यातील राजकीय तापमान वाढल्याचे भासत आहे. या पार्श्वभूमीवर, उपराजधानीत ७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. 'राजकीय मेळा' म्हणूनही काही जण अधिवेशनाकडे बघत असतात. अधिवेशनाच्या वेळी सभागृहाच्या आत आणि बाहेर एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप होत असतात. सवाल - जवाब आणि आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी नेत्यांकडून डागल्या जात असल्या तरी अधिवेशनाच्या कामकाजाच्या संबंधाने येथे येणाऱ्या प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक नेत्यांचा संवाद निट व्हावा, त्यांना बोलण्या-ऐकण्यात कसलीही अडचण होऊ नये, सारेच सुस्पष्ट व्हावे, यासाठी भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएल गेल्या काही दिवसांपासून चांगलेच परिश्रम घेत आहे.
आज अपवाद वगळता आत-बाहेर सर्वच जण मोबाईलचा वापर करीत असले तरी मंत्रालय, सचिवालय, विविध मंत्र्यांची दालनात लॅण्डलाईनच (टेलिफोन) असतो. त्याच्याच आधारे सरकारी यंत्रणांचा अंतर्गत संवाद, कागदोपत्री आदेश, अधिसूचना देवाणघेवाणीची आणि प्रसारणाची प्रक्रिया पार पाडली जाते.यंदाच्या हिवाळी अधिवेशनात या प्रक्रियेत कसलाही व्यत्यय नको म्हणून बीएसएनएलचे अधिकारी कर्मचारी परिश्रम घेत आहेत. त्यांच्या माहितीनुसार, यंदा मंत्रालय, सचिवालय, विविध मंत्र्यांची दालनं, पार्टी कार्यालये आदी ठिकाणी ३८९ टेलिफोन लावले जाणार आहेत. त्यासाठी जुन्या ११२ कॉपर लाईन काढून संवाद अधिक स्पष्ट करणाऱ्या १४५ नव्या फायबर टू द होम (एफटीटीएच) लाईन जोडण्यात आल्या आहेत. जुन्या कॉपर लाईनच्या तुलनेत एफटीटीएचमुळे इंटरनेट सुविधा ३० ते ३०० एमबीपीएस फास्ट करता येते. अन्य संबंधित कामेही उरकण्यात आली आहेत.
सिटिंग अरेजमेंटची अपेक्षा
फायबर लाईनचे काम जवळपास पूर्ण झाले असून, विधानसभा-परिषदेत सिटिंग अरेंजमेंट झाली की लगेच मोडेम आणि टेलिफोन कनेक्शन जोडले जाणार असल्याचे संबंधितांनी सांगितले आहे.