नरखेड : नरखेड तालुक्यातील विविध रखडलेले प्रकल्प, शासकीय इमारतींचे बांधकाम आणि रस्त्यांना नवा लूक देण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने २०८ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. निधी नसल्याने अनेक कामे रखडली होती. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत होते. मंजूर करण्यात आलेल्या निधीतून तहसील कार्यालय इमारत बांधकामासाठी (१०.१७ कोटी), कारंजा-नरखेड-मोहदी (द)- सिवनी महामार्ग निर्मितीसाठी जमीन हस्तांतरण (३२.५० कोटी), जलालखेडा-मोवाड (मध्यप्रदेश सीमेपर्यंत) रस्ते बांधकाम ११६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासोबतच खरसोली ते येरला, बेलफाटा-भिष्णूर-नरखेड रस्ता, परसोडी-विवरा, जलालखेडा-उमठा, खरसोली- जुनोना, येणीकोणी-अंबाडा, नायगाव-थाटूरवाडा, भायवाडी-इंदोरा रस्त्याचे बांधकाम, येणीकोणी गोडाऊन, लोहारीसावंगा गोडाऊन, खरसोली कौशल्य विकास केंद्राचा विकास आदी कामांचा यात समावेश आहे. पंचायत समिती सभागृहात आयोजित पत्रपरिषदेत सभापती नीलिमा रेवतकर, उपसभापती वैभव दळवी यांनी याबाबतची माहिती दिली. तालुक्यातील रखडलेल्या प्रकल्पासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींच्या वतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे यासंदर्भात पाठपुरावा करण्यात आला होता. यावेळी सतीश शिंदे, सतीश रेवतकर, नरेश अरसडे, बंडोपंत उमरकर, मनीष फुके आदी उपस्थित होते.
नरखेड तालुक्याला सरकारचा बूस्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:15 IST