चाचेरमध्ये मालगाडी रुळावरून घसरली : प्रवाशांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 00:46 IST2019-04-14T00:45:32+5:302019-04-14T00:46:14+5:30
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील चाचेर रेल्वेस्थानकावर शनिवारी सायंकाळी ५.१५ वाजता मालगाडीची एक वॅगन रुळावरून खाली घसरली. यामुळे हावडा-मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली. अनेक रेल्वेगाड्यांना नागपूरशिवाय इतवारी, चाचेर, तारसा, खात आदी रेल्वेस्थानकावर रोखून धरण्यात आले.

चाचेरमध्ये मालगाडी रुळावरून घसरली : प्रवाशांची गैरसोय
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील चाचेर रेल्वेस्थानकावर शनिवारी सायंकाळी ५.१५ वाजता मालगाडीची एक वॅगन रुळावरून खाली घसरली. यामुळे हावडा-मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली. अनेक रेल्वेगाड्यांना नागपूरशिवाय इतवारी, चाचेर, तारसा, खात आदी रेल्वेस्थानकावर रोखून धरण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार मालगाडी चाचेर रेल्वेस्थानकाच्या यार्डातून निघून मुख्य मार्गावर पोहोचत असताना वॅगन क्रमांक ६२१९१९ चे एक चाक किलोमीटर क्रमांक १०९९/२१ येथे रुळावरून घसरले. मालगाडीचा वेग कमी असल्यामुळे इतर वॅगन रुळावरून घसरल्या नाहीत. त्यापूर्वीच मालगाडी थांबविण्यात आली. या घटनेमुळे हावडा-मुंबई अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली. घटनेची माहिती मिळताच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले तर वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सी. रमणा यांनी इतवारी तसेच विभागीय वाणिज्य व्यवस्थापक तोमर आणि इतर अधिकाऱ्यांनी नियंत्रण कक्षातून परिस्थितीवर नियंत्रण ठेवले. या घटनेमुळे नागपुरातून सुटलेली १२१३० आझाद हिंद एक्स्प्रेसला चाचेर येथे थांबविण्यात आले. १२८१० हावडा-मुंबई मेलला तारसा आणि हावडा-लोकमान्य टिळक टर्मिनस समरसता एक्स्प्रेसला थांबविण्यात आले. नागपूर रेल्वेस्थानकावर १२८३३ अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस, १२८५९ मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस, ११०३९ कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेसला रोखून धरण्यात आले. याशिवाय ६८७१६ इतवारी-डोंगरगड लोकलला इतवारी रेल्वेस्थानकावर तसेच ६८७१५ बालाघाट-इतवारी लोकलला खात रेल्वेस्थानकावर रोखून धरण्यात आले. वृत्त लिहिपर्यंत अप लाईनवरील वाहतुक सुरळीत करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले. तर डाऊन लाईनवरील काम सुरुच होते.