खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 00:19 IST2025-08-06T00:19:00+5:302025-08-06T00:19:50+5:30

Nagpur to Pune Vande Bharat Express: सध्या नागपूर-पुणे मार्गावर सर्वात वेगाने धावणारी गाडी म्हणजे हावडा-दुरांतो एक्स्प्रेस होय. १२ तास, ५५ मिनिटांत ती नागपूरहून पुण्याला पोहचते.

Good news... Nagpur-Pune Vande Bharat Express to be launched soon; PM Modi will flag off the journey | खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 

खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 

नागपूर : विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील लाखो प्रवाशांकडून प्रतीक्षा केल्या जाणाऱ्या नागपूर (अजनी) पुणे स्लीपर वंदे भारत ट्रेन लवकरच सुरू होणार आहे. पुढच्या काही दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी बेळगाव-बंगळुरू आणि श्री माता वैष्णोदेवी कटरा-अमृतसरला जोडणाऱ्या दोन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखविणार असून, या गाड्यांसोबतच अजनी-पुणे वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेसचादेखील त्याचवेळी शुभारंभ होण्याचे संकेत मिळाले आहेत.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

नागपूर-पुणे मार्गावर रेल्वे प्रवाशांची १२ महिने प्रचंड गर्दी असते. त्यामुळे या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करावी, अशी दोन वर्षांपासून मागणी आहे. सध्या नागपूर-पुणे मार्गावर सर्वात वेगाने धावणारी गाडी म्हणजे हावडा-दुरांतो एक्स्प्रेस होय. १२ तास, ५५ मिनिटांत ती नागपूरहून पुण्याला पोहचते. वंदे भारत एक्स्प्रेस १२ तासांतच हे अंतर पूर्ण करणार आहे. दरम्यान, ८१० किलोमीटरचा प्रवास बसून करणे त्रासदायक होत असल्याने 'वंदे भारत स्लीपर कोच एक्स्प्रेस' सुरू करावी, अशी मागणी आहे. ही मागणी लवकरच पूर्ण होणार असल्याचे शिर्षस्थ सूत्रांनी सांगितले आहे.

सणासुदीत मिळणार भेट !

नागपूर-पुणे मार्गावर बाराही महिने प्रवाशांची गर्दी असते. सणासुदीच्या दिवसांत गर्दीत मोठी भर पडते. त्यामुळे खासगी प्रवासी बस आणि विमान कंपन्या मोठ्या प्रमाणात प्रवास भाडे वाढवितात. अशात ऐन सणासुदीच्या दिवसांत वंदे भारत सुरू होणार असल्याचे वृत्त पुढे आल्यामुळे ती प्रवाशांसाठी सणासुदीची मोठी भेट ठरणार आहे.

या प्रवाशांनाही लाभ !

अजनी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस नागपूर-पुण्यादरम्यानचा प्रवास करताना वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड आणि दौंड,अहिल्यानगर, कोपरगाव यांसारख्या प्रमुख स्थानकांवर थांबे घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे गर्दीच्या शहरांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही गाडी अधिकच सोयीची होणार आहे.

वंदे भारत धावणार, मात्र...

नागपूर-पुणे-नागपूर वंदे भारत एक्सप्रेस काही दिवसांतच सुरू होणार असून, त्या संबंधाने रेल्वे मंत्रालयात तयारी झाल्याची शिर्षस्थ सूत्रांची माहिती आहे. या संबंधाने स्थानिक शिर्षस्थ अधिकाऱ्यांकडे संपर्क केला असता त्यांनी गाडी सुरू होणार, मात्र अद्याप अधिकृत ‘नोटिफिकेशन’ झाले नसल्याचे अर्थात शुभारंभाची तारीख निश्चित झाली नसल्याचे स्पष्ट केले.

Web Title: Good news... Nagpur-Pune Vande Bharat Express to be launched soon; PM Modi will flag off the journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.