टॅरिफ 'वार'मध्ये विदर्भासाठी गुड न्यूज! तब्बल ११,६४२ कोटींची गुंतवणूक येणार; नवीन उद्योग कोणत्या जिल्ह्यात सुरू होणार?
By शुभांगी काळमेघ | Updated: August 29, 2025 19:22 IST2025-08-29T19:21:00+5:302025-08-29T19:22:42+5:30
Nagpur : गुंतवणूक विविध क्षेत्रांमध्ये होत असून, इलेक्ट्रिक व्हेइकल्स (EV) बस व ट्रक उत्पादन, इलेक्ट्रॉनिक्स, स्टील, सोलर मोड्युल आणि संरक्षण (डिफेन्स) क्षेत्र यांचा त्यामध्ये समावेश आहे.

Good news for Vidarbha in tariff 'war'! Investment of Rs 11,642 crores will come; In which district will the new industry be started?
नागपूर : अमेरिका आणि भारतामध्ये टॅरिफ वॉर सुरु असतांना देखील उद्योजकांनी महाराष्ट्रावर विश्वास दाखवत राज्यात १७ गुंतवणुक करार झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. महाराष्ट्रात एकूण १७ उद्योग गुंतवणूक करार करण्यात आले त्यापैकी ६ मोठे करार विदर्भातील जिल्ह्यांसाठी केले असून, यामध्ये ११,६४२ कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे. या गुंतवणुकीतून गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये भविष्यातील औद्योगिक केंद्रे विकसित होणार असून, हजारो नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ही गुंतवणूक विविध क्षेत्रांमध्ये होत असून, इलेक्ट्रिक व्हेइकल्स (EV) बस व ट्रक उत्पादन, इलेक्ट्रॉनिक्स, स्टील, सोलर मोड्युल आणि संरक्षण (डिफेन्स) क्षेत्र यांचा त्यामध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे, जागतिक स्तरावर टॅरिफ वॉर सुरू असताना देखील गुंतवणूकदारांनी महाराष्ट्रावर विश्वास दाखवत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये या प्रकल्पांची योजना आखली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, "राज्यात मित्रत्वपूर्ण औद्योगिक धोरण राबवण्यात येत आहे, 'मैत्री' या पोर्टलच्या माध्यमातून उद्योगपतींना एन्ड-टू-एन्ड सुलभ सेवा देण्यात येत आहेत. यामुळे महाराष्ट्र गुंतवणुकीसाठी देशातील आघाडीचा पर्याय ठरत आहे."
राज्यातील एकूण गुंतवणूक आणि रोजगार
या १७ करारांद्वारे राज्यात ३४,००० कोटींहून अधिक गुंतवणूक होणार असून, ३३,००० नवीन रोजगार निर्माण होतील. त्यात उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये ५ करार, पुणे जिल्ह्यात ५ करारांसह तब्बल ११,९६६ कोटींची गुंतवणूक, रायगडमध्ये देखील ३,००० कोटींचे प्रकल्प होणार आहेत.