सायबर गुन्ह्यांमागे 'गोल्डन ट्रॅगल', देशात जागोजागी आहेत एजंट्स

By योगेश पांडे | Updated: April 28, 2025 11:20 IST2025-04-28T11:10:31+5:302025-04-28T11:20:02+5:30

Nagpur : कंबोडिया, म्यानमार, लाओस अन् सायबर गुन्ह्यांचे 'चिनी कनेक्शन'

'Golden Triangle' behind cybercrimes, agents are spread across the country | सायबर गुन्ह्यांमागे 'गोल्डन ट्रॅगल', देशात जागोजागी आहेत एजंट्स

'Golden Triangle' behind cybercrimes, agents are spread across the country

योगेश पांडे 
नागपूर :
मागील काही काळापासून नागपूर राज्यासह देशभरात सायबर गुन्हे वाढीस लागले आहेत. दर आठवड्याला सायबर गुन्हेगारांकडून काही ना काही वेगळे फंडे वापरून नागरिकांना जाळ्यात ओढण्यात येते व त्यातून हजारो कोटी रुपये त्यांच्या घशात जातात. सुरक्षा यंत्रणांच्या हायटेक तपासानंतर सायबर गुन्हेगारांची नवीन मोडस ऑपरेंडी समोर आली आहे. अगोदर देशातील 'जामतारा'सारख्या भागांना सायबर गुन्हेगारीचे हब मानण्यात येत होते. मात्र, आता गुन्हेगारांकडून त्यांच्या 'गोल्डन ट्रॅगल'मध्ये बसून आंतरराष्ट्रीय पातळीवरून सायबर गुन्हेगारी संचालित करण्यात येत आहे. सायबर गुन्हेगारांच्या या 'गोल्डन ट्रॅगल'मध्ये कंबोडिया, म्यानमार व लाओस या प्रदेशांचा प्रामुख्याने समावेश होतो. 


देशातील काही सायबर गुन्ह्यांच्या तपासादरम्यान पोलिसांना प्रामुख्याने ही बाब निदर्शनास आली. अगोदर देशात जामतारासह २० वेगवेगळ्या हॉटस्पॉट्सवरून सायबर गुन्हे प्रामुख्याने संचालित केले जात होते. मात्र, आता कंबोडिया, म्यानमार आणि लाओस या प्रदेशांचा समावेश असलेला गोल्डन ट्रॅगल हा मोठ्या प्रमाणात सायबर फसवणुकीचे प्रमुख केंद्र बनला आहे. 


तेथील रॅकेटचे संचालन प्रामुख्याने चायनीज गुन्हेगारांकडून राकडून करण्यात येते. मात्र, त्यांचे एजंट्स देशात विविध ठिकाणी बसून नागरिकांना जाळ्यात ओढण्याचे काम करतात. काही दिवसांअगोदर नागपुरातील एका गुन्ह्याच्या चौकशीतदेखील असेच चायनीज कनेक्शन समोर आले होते. केरळ उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश शशिधरन नांबियार यांच्याकडून ९० लाख रुपयांच्या फसवणुकीशी संबंधित प्रकरणात पोलिसांना 'गोल्डन ट्रॅगल' या तथाकथित 'गोल्डन ट्रॅगल'मधून कार्यरत असलेल्या चिनी सायबर फसवणूक सिंडिकेटचे संबंध सापडले आहेत.


तरुणांना ढकलले जातेय गुन्ह्यांच्या दलदलीत
या तीनही ठिकाणी रोजगारासाठी गेलेल्या काही भारतीय तरुणांचा चायनीज गुन्हेगारांकडून वापर करण्यात येतो. त्यांना विविध माध्यमांतून ब्लॅकमेल करून, प्रसंगी त्यांचे अपहरण करून किंवा दहशत दाखवून त्यांना सायबर गुन्हाच्या 'डेस्क'वर ढकलले जाते. त्यांना भारतीयांना जाळ्यात ओढण्याचे टार्गेटदेखील दिले जाते. त्या बदल्यात काही प्रमाणात मोबदला दिला जातो. मात्र, टार्गेट पूर्ण झाले नाही तर त्यांच्यावर वेगवेगळे अत्याचारदेखील करण्यात येतात.


बिटकॉइनमधून चालतो व्यवहार
'गोल्डन ट्रॅगल'मधून संचालित होणाऱ्या सायबर गुन्ह्यांमध्ये जनतेचे पैसे अगोदर भारतीय एजंट्सने भाड्यावर घेतलेल्या बैंक खात्यांमध्ये वळते होतात. तेथून ते पैसे चायनीज गुन्हेगारांकडे जातात व त्यांचे बिटकॉइनमध्ये रूपांतर करण्यात येते. बिटकॉइनच्या माध्यमातून सिंडिकेटमधील विविध लोकांना ते पैसे पाठविण्यात येतात. त्यात काही शेल कंपन्यादेखील असतात. या कंपन्यांशी जुळलेले अनेक जण एजंट्स म्हणून काम करत असतात. या क्रिप्टो करन्सीच्या 'मनी ट्रेल' काढणे सुरक्षा यंत्रणांसाठी मोठे आव्हानच असते.


कंबोडिया, म्यानमार, लाओस अन् सायबर गुन्ह्यांचे 'चिनी कनेक्शन'
आधी देशातील 'जामतारा'सारख्या भागांना सायबर गुन्हेगारीचे हब मानण्यात येत होते. मात्र, आता गुन्हेगारांकडून त्यांच्या 'गोल्डन ट्रॅगल'मध्ये बसून आंतरराष्ट्रीय पातळीवरून सायबर गुन्हेगारी संचालित करण्यात येत आहे. सायबर गुन्हेगारांच्या या 'गोल्डन ट्रॅगल'मध्ये कंबोडिया, म्यानमार व लाओस या प्रदेशांचा प्रामुख्याने समावेश होतो.

Web Title: 'Golden Triangle' behind cybercrimes, agents are spread across the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.