नागपुरात दिवाळीपर्यंत सोने ४२ हजारांवर जाणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 11:19 IST2019-08-07T11:19:08+5:302019-08-07T11:19:35+5:30
जागतिक घडामोडीचा थेट परिणाम बाजारातील किमतीवर होत असल्यामुळे मोठ्या सराफांनी सोन्याच्या खरेदीला प्राधान्य दिले आहे.

नागपुरात दिवाळीपर्यंत सोने ४२ हजारांवर जाणार !
मोरेश्वर मानापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जागतिक घडामोडीचा थेट परिणाम बाजारातील किमतीवर होत असल्यामुळे मोठ्या सराफांनी सोन्याच्या खरेदीला प्राधान्य दिले आहे. भाव वाढत असतानाही लोकांनी खरेदी वाढविली असून उन्हाळ्यातील लग्नासाठी आजच खरेदी करीत असल्याचे चित्र आहे. स्थानिक बाजारात सोन्याचा भाव उच्चांकी स्तरावर पोहोचला आहे. दिवाळीपर्यंत ४२ हजारांवर जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
रोकडे ज्वेलर्सचे संचालक राजेश रोकडे यांनी सांगितले की, गेल्या महिन्यापासूनच सोन्याचे भाव वाढत आहेत. ग्राहक गुंतवणूक म्हणून मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहेत. दुसरीकडे अनेक गुंतवणूकदार डॉलरमधील गुंतवणूक कमी करत आहेत.
जागतिक बाजारपेठेत सध्या अस्थिरतेचे वातावरण आहे. त्यामुळे दिवाळीत सोन्याचा भाव ४२ हजाराचा आकडा गाठू शकतो. एकीकडे सोने महाग होत असताना दुसरीकडे चांदीचे भावही वधारत आहेत. २००० नंतर पहिल्यांदाच सोन्याच्या भावांमध्ये विक्रमी दरवाढ पाहायला मिळते आहे.
रोकडे म्हणाले, यावर्षी १ ते ६ ऑगस्टपर्यंत सहा दिवसात सोन्याचे भाव प्रति तोळा १,७०० रुपयांनी वाढले आहेत. १ ऑगस्टच्या ३४,६०० रुपयांच्या तुलनेत ६ ऑगस्टला भाव ३६,३०० रुपयांवर पोहोचले आहेत. तीन टक्के जीएसटी आकारून सोने ३७,३८९ रुपयांवर गेले आहे. याशिवाय चांदी प्रति किलो ४२,००० रुपये असून जीएसटी आकारून भाव ४३,२६० रुपयांवर पोहोचली आहे. गेल्यवर्षीचा तुलनात्मक तक्ता पाहिल्यास सन २०१८ च्या ६ ऑगस्टच्या तुलनेत भाव ६,७०० रुपयांनी वाढले आहे. आता सोन्यात जास्त परतावा मिळू लागल्यामुळे ग्राहक गुंतवणुकीच्या उद्देशाने सोने खरेदी करीत आहेत. सध्या काहीच दुकानदार हॉलमार्कचे दागिने विकत आहेत. पण केंद्र सरकार हॉलमार्किंग दागिन्यांची विक्री बंधनकारक करणार असल्यामुळे ग्राहकांना सोन्याच्या शुद्धतेबाबत हमी मिळेल, असे रोकडे यांनी सांगितले.