आराेग्य विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात नागपूरच्या तीन डाॅक्टरांना सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 12:17 IST2022-03-03T11:07:59+5:302022-03-03T12:17:36+5:30
विविध विद्याशाखांच्या पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासिता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या १०,०६९ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या आहेत.

आराेग्य विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात नागपूरच्या तीन डाॅक्टरांना सुवर्णपदक
नागपूर : आराेग्य विज्ञान विद्यापीठाचा एकेविसावा दीक्षांत समारंभ बुधवारी नाशिक येथे पार पडला. कुलपती व राज्यपाल भगतसिंह काेश्यारी यांच्या अध्यक्षतेत ऑनलाईन पार पडलेल्या समारंभात गुणवत्ता यादीत आलेल्या नागपूरच्या तीन डाॅक्टरांनाही सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले.
ओरल पॅथालाॅजी विभागात शासकीय दंत महाविद्यालय नागपूरचा डाॅ. अभिनंध क्रिष्णा, ओरल ॲन्ड मॅक्सिलाेफेशियल सर्जरी विभागात शासकीय दंत महाविद्यालयाच्या डाॅ. भावना वळवी आणि एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालयाच्या डाॅ. आयुषी अजय केवलिया यांना एमबीबीएसमध्ये सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. याशिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूरचे आर. गाेकुलकृष्णन यांनीही सुवर्णपदक प्राप्त केले आहे.
विद्यापीठाच्या ऑनलाईन दीक्षांत समारंभास प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, नवी दिल्ली येथील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक तथा केंद्र सरकारच्या आरोग्य संशोधन विभागाचे सचिव प्रा.डॉ. बलराम भार्गव उपस्थित होते. याप्रसंगी कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त), प्र-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता डॉ. सचिन मुंब्रे, डॉ. जयंत पळसकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. धनाजी बागल, डॉ. राजश्री नाईक, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वित्त व लेखाधिकारी एन.व्ही. कळसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
विविध विद्याशाखांच्या पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासिता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या १०,०६९ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या आहेत. विविध विद्याशाखांमधील गुणवत्ता प्राप्त केलेल्यांना ९८ सुवर्णपदक, संशोधन अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ३९ विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली.
आधुनिक वैद्यक विद्याशाखा पदवीचे ५१३, दंत विद्याशाखा पदवीचे २०४१, आयुर्वेद विद्याशाखेचे १०२१, युनानी विद्याशाखेचे ७०, होमिओपॅथी विद्याशाखेचे ९३६, बेसिक बी.एस्सी. नर्सिंग १७४४, पीबी बी.एस्सी. नर्सिंग विद्याशाखेचे ३३६, बी.पी.टी.एच. विद्याशाखेचे १५०, बी.ओ.टी.एच. विद्याशाखेचे १४, बी.ए.एस.एल.पी. विद्याशाखेचे ३१, बी.पी.ओ. विद्याशाखेचे ३, डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री विद्याशाखेच्या ६ विद्यार्थ्यांना तसेच पदव्युत्तर विद्याशाखेतील एम.डी.मेडिकल विद्याशाखेचे २१४१, पी. जी. दंत ४६१, पी.जी. आयुर्वेद ९३, पी.जी. होमिओपॅथी ५३, पी.जी. युनानी ४, पी.जी. डी.एम.एल.टी. ७८, पॅरामेडिकल १०४, पी.जी. अलाईड (तत्सम) २७२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली आहे.