मोरेश्वर मानापुरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेत दिसून येत आहे. याचाच प्रत्यय गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या दरात झालेल्या लक्षणीय वाढीतून मिळाला. गुंतवणूकदारांचा वाढता कल, जागतिक अर्थव्यवस्थेत निर्माण झालेली अनिश्चितता आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे झालेलं अवमूल्यन यामुळे मौल्यवान धातूंना मागणी वाढली आहे.
सोने २,४०० आणि चांदीत ४,७०० रुपयांची उसळी!
गेल्या सात दिवसांत नागपुरात सोन्याने तब्बल २,४०० रुपयांची झेप घेतली. शनिवारी सराफांकडे २४ कॅरेट दहा ग्रॅम सोने ३ टक्के जीएसटीसह १,१३,०९४ रुपयांत विकल्या गेले. चांदीनेही ४,७०० रुपयांची उसळी घेतली. भाव प्रतिकिलो १,३२,८७० रुपयांवर पोहोचले.
सध्या लग्नसराई हंगाम जवळ येत असल्याने दागदागिन्यांच्या खरेदीत ग्राहकांची चांगलीच गर्दी वाढू लागली आहे. त्यातच सोने आणि चांदीचे दर दिवसेंदिवस चढल्याने व्यापारी वर्गामध्ये मिश्र प्रतिक्रिया आहे. तर, ग्राहकांसाठी चिंतेचा विषय आहे. दुसरीकडे गुंतवणूकदार दीर्घकालीन सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोने आणि चांदीला प्राधान्य देत आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात चलनफुगवटा, मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थिती आणि अमेरिकन फेडरल बँकेच्या धोरणांमुळे सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली. येत्या काळातही दरात चढउतार सुरू राहतील, मात्र सध्याच्या परिस्थितीवरून पाहता सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये स्थिरता येण्याची फारशी चिन्हे दिसत नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
नागपुरात सोने-चांदीचे जीएसटीसह भाव :दिनांक सोने (२४ कॅरेट) चांदी (प्रतिकिलो)८ सप्टें. १,११,३४३ १,२८,९५६१० सप्टें. १,१२,९९१ १,२९,०५९१३ सप्टें. १,१३,०९४ १,३२,८७०