नागपूरच्या प्रसिद्ध ब्युटी पार्लरमधून सोने व हिरेजडित दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 00:55 IST2018-10-27T00:54:21+5:302018-10-27T00:55:07+5:30
ब्युटी पार्लरमध्ये गेलेल्या दोन महिलांचे सोने तसेच हिरेजडित दागिने चोरीला गेले. मंगळवारी दुपारी ही घटना घडली. चोरीला गेलेल्या ऐवजाची किंमत पावणेतीन लाख रुपये असून, बजाजनगर पोलिसांनी या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

नागपूरच्या प्रसिद्ध ब्युटी पार्लरमधून सोने व हिरेजडित दागिने लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ब्युटी पार्लरमध्ये गेलेल्या दोन महिलांचे सोने तसेच हिरेजडित दागिने चोरीला गेले. मंगळवारी दुपारी ही घटना घडली. चोरीला गेलेल्या ऐवजाची किंमत पावणेतीन लाख रुपये असून, बजाजनगर पोलिसांनी या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
श्रेयस मेहाडिया (रा. गोदरेज आनंदम) यांनी बजाजनगर पोलिसांकडे नोंदविलेल्या तक्रारीनुसार, पूजा मेहाडिया तसेच मामांची सून वर्षा अग्रवाल या दोघी अत्रे लेआऊटमधील चेंज सलूनमध्ये २३ आॅक्टोबरला दुपारी १२ वाजता आल्या. फेशियल करतेवेळी पूजा यांनी त्यांच्या कानातील सव्वादोन लाखांच्या हिरेजडित सोन्याच्या रिंग तसेच वर्षा यांनी त्यांच्या हातातील ५० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे ब्रेसलेट आपापल्या पर्समध्ये काढून ठेवले. फेशियल आटोपल्यानंतर त्यांनी सलूनमध्ये एकूण २६०० रुपये दिले. बाहेर आल्यानंतर त्यांनी पर्समध्ये दागिने तपासले असता त्यात ते आढळले नाही. या दागिन्यांसोबतच वर्षा यांच्या पर्समधील २ हजार रुपयेही चोरीला गेले होते. त्यामुळे पूजा आणि वर्षा यांनी सलून मालकाकडे दागिने तसेच रकमेबाबत विचारणा केली. त्यांनी कानावर हात ठेवले. त्यामुळे या दोघींनी आपापल्या कुटुंबीयांना ही माहिती दिली. श्रेयस यांनी लगेच मामांसोबत सलून गाठून सलूनच्या बाहेर असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी या दोघींकडे दागिने असल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले. आतमध्ये मात्र सीसीटीव्ही नसल्याने ते दागिने कुणी चोरले, ते स्पष्ट झाले नाही. श्रेयस यांनी बजाजनगर ठाण्यात या घटनेची तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या घटनेला ४८ तासांपेक्षा जास्त अवधी होऊनही चोरट्यांचा छडा लागला नव्हता.