‘जीएमसी’चा विद्यार्थी देशात अव्वल! 'नीट’ सुपर स्पेशालिटीमध्ये डॉ. जैनने मिळविले ‘ऑल इंडिया रॅँक १’
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 18:31 IST2025-04-29T18:07:47+5:302025-04-29T18:31:49+5:30
६०० पैकी ४९८ गुण : नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

‘GMC’ student tops the country! Dr. Jain achieves ‘All India Rank 1’ in ‘NEET’ Super Specialty
सुमेध वाघमारे
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (जीएमसी) शल्यक्रियाशास्त्र विभागाचा विद्यार्थी डॉ. यश जैन याने 'नीट सुपर स्पेशालिटी' परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकावून नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ‘जीएमसी’च्या सर्जरी विभाग (युनिट १) मधील वरिष्ठ निवासी डॉक्टर डॉ. यश याने ‘नीट सुपर स्पेशालिटी-२०२४’च्या परीक्षेत ६०० पैकी ४९८ गुण घेतले.
या उल्लेखनीय यशाबद्दल ‘जीएमसी’ मध्ये मंगळवारी डॉ. यश यांचा सत्कार करण्यात आला. अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे आणि सर्जरी विभागातील वरिष्ठ डॉक्टर उपस्थित होते. डॉ. यश यांचे वडील सुनील जैन यांचा छोटासा इलेक्ट्रिकल्सचा व्यवसाय आहे, तर त्यांची आई पूजा गृहिणी आहे. डॉ. यशचा जन्म ओडिशा राज्यातील कांताबांजी या केवळ २० हजार लोकसंख्या असलेल्या एका लहानशा गावात झाला. त्या काळात या भागातील लोकांना औषधोपचारासाठी १०० ते १५० किलोमीटरचा प्रवास करावा लागत होता. याचमुळे डॉ. यशच्या आजोबांनी कुटुंबात एक डॉक्टर असावा, अशी तीव्र इच्छा व्यक्त केली होती आणि ती डॉ. यशने पूर्ण केली. त्यामुळे डॉ. यश केवळ आपल्या गावातून पहिला डॉक्टरच ठरला नाही, तर त्याने आपल्या यशाने कुटुंबाचे स्वप्नही साकार केले. त्याने ‘एमबीबीएस’चे शिक्षण मुंबईतील के. ई. एम. महाविद्यालयातून पूर्ण केले.
डॉ. गजभिये होते मार्गदर्शक
‘एमबीबीएस’मध्ये उत्कृष्ट गुण मिळवल्यानंतर, पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी डॉ. यशने नागपुरातील ‘जीएमसी’च्या शल्यक्रियाशास्त्र विभागात प्रवेश घेतला. शल्यक्रिया शास्त्र विभागाचे तत्कालिन प्रमुख व अधिष्ठाता डॉ. राज गजभिये हे त्याचे मार्गदर्शक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाच, त्याने उच्च शिक्षणासाठी 'नीट सुपरस्पेशालिटी' परीक्षा दिली. सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांमधून तो प्रथम आला. डॉ. यश यांच्या यशाबद्दल ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
गोरगरिबांच्या सेवेचा ध्यास!
या अभूतपूर्व यशानंतर डॉ. यश जैनने आपली पुढील आकांक्षा व्यक्त केली. त्याला गॅस्ट्रो सर्जरीमध्ये विशेषज्ञता मिळवायची आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर तो केवळ शहरांमध्येच नव्हे, तर आपल्या जन्मगावी परत जाऊन सामाजिक बांधिलकी म्हणून गरीब रुग्णांची सेवा करण्याचा मानस आहे. या यशाचे संपूर्ण श्रेय त्याने मेडिकलचे अधिष्ठाता आणि त्याचे मार्गदर्शक डॉ. राज गजभिये यांना दिले आहे. याप्रसंगी डॉ. भूपेष तिरपुडे, डॉ. गायत्री देशपांडे, डॉ. हेमंत धानारकर, डॉ. गायत्री देशपांडे, डॉ. विक्रांत आकुलवार, डॉ. विपीन कुरसुंगे, डॉ. नवीन सोनवने, डॉ. पराग खंडाईत आदी उपस्थित होते.