घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 23:22 IST2025-08-21T23:21:32+5:302025-08-21T23:22:23+5:30
शिकवणी वर्गाला बाहेर पडण्याच्या बहाण्याने त्या थेट नागपुरात आल्या.

घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
नरेश डोंगरे
नागपूर - स्वप्न दाखविले, कोणती फूस लावली, कळायला मार्ग नाही. त्या दोघी कुटुंबियांना अंधारात ठेवून भंडारा जिल्ह्यातून नागपुरात पोहचल्या. येथून सेवाग्राम एक्सप्रेसमध्ये बसून थेट मुंबईकडे निघाल्या. मात्र, गाव, घरच्या मंडळींचे अंतर जस-जसे वाढत होते, तसतशी त्यांची अस्वस्थताही वाढत होती. या स्थितीत नागपूर-भुसावळ दरम्यान एका टीसीची (तिकिट तपासणीस) त्यांच्यावर नजर गेली अन् नंतर घडलेल्या घटनाक्रमामुळे त्या दोघींचे भवितव्य सुरक्षित झाले.
सोना आणि मोना (नाव काल्पनिक) भंडारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. नववीत शिकणाऱ्या या दोघींचे वय अनुक्रमे १३ आणि १४ वर्षे आहे. बुधवारी शिकवणी वर्गाला बाहेर पडण्याच्या बहाण्याने त्या थेट नागपुरात आल्या. येथे ट्रेन नंबर १२१४० सेवाग्राम एक्सप्रेस पकडून त्या मुंबईकडे निघाल्या. प्रारंभी त्या आश्वस्त होत्या. मात्र, आपल्या गावाचे, घरच्यांचे अंतर जस-जसे वाढू लागले, तसतशी त्यांची अस्वस्थताही वाढली. गाडी सुसाट वेगाने धावत होती. अशात एस-५ कोचमध्ये रोहित शुक्ला नामक टीसीने या दोघींकडे तिकिट मागितले. त्यांच्याकडे तिकिट नव्हतीच. त्यामुळे आधीच भेदरलेल्या या दोघी जास्तच घाबरल्या. त्या दोघी विनातिकिट प्रवास करीत आहे आणि कुटुंबातील किंवा ओळखीचा कोणताही व्यक्ती त्यांच्यासोबत नसल्याचे लक्षात येताच रोहित यांनी त्यांचे सहकारी विजय वर्मा आणि अंशूल जैन यांना ही बाब सांगितली. प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन या तिघांनी वाणिज्य नियंत्रकांच्या माध्यमातून रेल्वे सुरक्षा दलाला (आरपीएफ) ही माहिती कळविली. त्यांनी लगेच या दोघींना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली.
पालकांचा जीव भांड्यात
प्राथमिक चाैकशीत या दोघींनी सांगितलेले घर सोडण्याचे कारण ऐकून आरपीएफ तसेच चाईल्ड लाईनच्या सदस्यांनाही धक्का बसला. त्यानंतर या दोघींचे समुपदेशन करून त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्यात आला. तिकडे मुली गायब झाल्याचे लक्षात आल्यापासून दोघींचेही पालक अस्वस्थ होते. या दोघी सोबत आणि सुरक्षित असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्या जिवात जीव आला.
एकट्या मुलींना हेरून त्यांना वेगवेगळे आमिष दाखवायचे किंवा फूस लावून त्यांचे अपहरण करायचे आणि नंतर त्यांचे लैंगिक शोषण करायचे, असे प्रकार सर्वत्र नेहमी होत असल्याचे दिसून येते. या प्रकरणातील दोघींचे वय आणि त्यांची एकूणच स्थिती बघता त्यांचे भवितव्य धोक्यात आले होते. मात्र, तिकिट तपासणीसांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे त्या दोघी सुखरूप कुटुंबियात पोहचण्याचा मार्ग सुकर झाला.