GBS Disease: काळजी घ्या! पुण्यानंतर जीबीएस नागपूरमध्ये पसरतोय हातपाय; 32 रुग्णांची नोंद

By सुमेध वाघमार | Updated: August 26, 2025 18:16 IST2025-08-26T18:16:21+5:302025-08-26T18:16:47+5:30

महिन्याकाठी पाच रुग्ण : लक्षणे दिसताच उपचार घेण्याचा सल्ला

GBS Disease: Be careful! After Pune, GBS is spreading in Nagpur; 32 patients registered | GBS Disease: काळजी घ्या! पुण्यानंतर जीबीएस नागपूरमध्ये पसरतोय हातपाय; 32 रुग्णांची नोंद

GBS Disease: Be careful! After Pune, GBS is spreading in Nagpur; 32 patients registered

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
'गुलियन बॅरी सिंड्रोम' (जीबीएस) हा दुर्मीळ आजार असला तरी याचे रुग्ण वाढताना दिसून येत आहे. एकट्या मेडिकलमध्ये आठ महिन्यांत ३२ रुग्णांची नोंद झाली आहे. यात ३ लहान मुले असून ३२ ते ६८ वयोगटातील रुग्ण आहेत. या आजारामध्ये मज्जातंतू हळूहळू निकामी होऊन रुग्णांची अवस्था पक्षाघात म्हणजे लकवा आल्यासारखी होते. त्यामुळे लक्षणे दिसताच उपचार घेण्याचा सल्ला मेडिकलच्या औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अतुल राजकोंडावार यांनी दिला आहे.


मेडिकलमध्ये कोरोनानंतर महिन्याकाठी 'जीबीएस'चे एक ते दोन रुग्ण उपचारासाठी येत असताना आता ही रुग्ण संख्या सरासरी पाचवर पोहोचली आहे. 'जीबीएस' ही एक दुर्मीळ ऑटोइम्यून न्यूरोलॉजिकल स्थिती आहे. यात शरीराची रोगप्रतिकारशक्ती स्वतःच्याच परिधीय मज्जातंतूंवर हल्ला करते. यामुळे स्नायू कमकुवत होतात आणि कधीकधी ते पूर्णतः निकामी होऊ शकतात. आजाराचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट नाही. त्यामुळे काळजी घेणे व लक्षणे दिसताच उपचार घेणे आवश्यक आहे.


या लक्षणांकडे दुर्लक्ष नको
चालण्यास त्रास, अशक्तपणा, हातापायांना मुंग्या येणे, हातापायांची ताकद कमी होणे, डायरिया, बोलण्यास किंवा अन्न गिळण्यास त्रास व श्वास घेण्यास त्रास होणे ही प्रारंभिक लक्षणे आहेत. हा आजार साधारणपणे पायांमधून सुरू होतो आणि हळूहळू वरच्या दिशेने पसरतो.


जीबीएसची गुंतागुंत
श्वासोच्छवासाचा त्रास जीवघेणा असू शकतो. यासाठी व्हेंटिलेटरचा आधार घ्यावा लागतो. या आजारातून बहुतेक रुग्ण पूर्णपणे बरे होतात. मात्र, काहींना रक्तदाबाचा चढउतार राहू शकतो. काहींच्या पायात रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात. आतड्याची हालचाल मंदावली जाऊ शकते किंवा लघवी रोखून धरली जाऊ शकते. जेव्हा सुरुवातीची लक्षणे अधिक गंभीर असतात तेव्हा हा आजार दीर्घकालीन व गुंतागुंत होण्याचा धोका वाढतो.


२० पुरुष १२ महिलांचा समावेश
मेडिकलच्या औषधवैद्यकशास्त्र विभागात जानेवारीमध्ये २, फेब्रुवारीत ५, मार्चमध्ये १, एप्रिलमध्ये १, मेमध्ये ९, जूनमध्ये ४, जुलैमध्ये ५ तर २२ ऑगस्टपर्यंत ५ असे ३२ रुग्ण आढळून आले आहेत. यात २० पुरुष व १२ महिलांचा समावेश आहे.


तातडीने निदान व योग्य उपचार आवश्यक
"'जीबीएस'च्या रुग्णांनी लवकर निदान करून योग्य उपचार सुरू केल्यास त्यांच्या स्थितीमध्ये सुधारणा होऊ शकते. उपचारांमध्ये साधारणपणे 'इंट्राव्हेनस इम्युनोग्लोब्युलिन' आणि 'प्लाज्माफेरेसिस' याचा वापर केला जातो. हे दोन्ही उपचार मेडिकलमध्ये उपलब्ध आहेत. सध्या एक रुग्ण 'प्लाज्माफेरेसिस'वर आहे. 'जीबीएस'वरील उपचार महागडा असलातरी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील लाभार्थ्यांना मोफत दिला जातो."
- डॉ. अतुल राजकोंडावार प्रमुख, औषधवैद्यकशास्त्र विभाग, मेडिकल

Web Title: GBS Disease: Be careful! After Pune, GBS is spreading in Nagpur; 32 patients registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.