दुचाकीच्या धडकेत कचरा वेचणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू, अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल
By दयानंद पाईकराव | Updated: July 22, 2023 16:48 IST2023-07-22T16:47:56+5:302023-07-22T16:48:08+5:30
तहसिल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना

दुचाकीच्या धडकेत कचरा वेचणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू, अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल
नागपूर : अज्ञात दुचाकी चालकाने धडक दिल्यामुळे एका कचरा वेचणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना तहसिल पोलिस ठाण्याच्या हद्दीत गांधीबाग गार्डन मागील रोडवर शुक्रवारी १४ जुलै रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
प्रविण दादाराव रोकडे (वय ३४, रा. आदर्शनगर, कळमना) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते कचरा वेचत असताना अज्ञात दुचाकी चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर दुचाकी चालक पळून गेला. जखमी प्रविण यांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
या प्रकरणी प्रविण यांचा भाऊ भानुदास दादाराव रोकडे (वय ३२) यांनी दिलेल्या तक्रारीवरून तहसिल पोलिसांनी अज्ञात दुचाकी चालकाविरुद्ध कलम २७९, ३०४ (अ), सहकलम १३४, १८४, १८७ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.