गणपती बाप्पाचा लालपरीला भरभरून आशीर्वाद! महामंडळाच्या ताफ्यात ४० ई-बसेससह ४२५ बसेसचा काफीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 19:58 IST2025-08-31T19:58:12+5:302025-08-31T19:58:51+5:30
रोज ८० ते ९० लाखांचे उत्पन्न. गर्दी वाढली; प्रवासी संख्या एक लाखाच्या घरात

गणपती बाप्पाचा लालपरीला भरभरून आशीर्वाद! महामंडळाच्या ताफ्यात ४० ई-बसेससह ४२५ बसेसचा काफीला
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रवाशांच्या सेवेत रात्रंदिवस धावपळ करणाऱ्या लालपरीला गणपती बाप्पा सध्या भरभरून आशीर्वाद देत आहेत. गणेशोत्सवाची सर्वत्र धूम सुरू असताना प्रवाशांची संख्या चांगलीच वाढली आहे. नागपूर जिल्ह्यातून दररोज सुमारे एक लाख प्रवासी बसने प्रवास करीत असल्यामुळे एसटीच्या तिजोरीत नागपूर विभागातून रोज ८० ते ९० लाखांची गंगाजळी जमा होत आहे.
गणेशोत्सवाच्या मंगलमय काळात सर्वत्र भरभराटीचे वातावरण असते. अशात प्रवाशांच्या सेवेत रात्रंदिवस धावफळ करणाऱ्या लालपरीला अर्थात एसटी महामंडळाच्या बसेसमध्येसुद्धा प्रवाशांची मोठी गर्दी होते. गेल्या आठवड्याभरापासून रोज साधारणतः एक लाख प्रवासी एकट्या नागपूर जिल्ह्यातून प्रवास करीत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यात एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्या ४० ई-बसेससह एकूण ४२५ बसेसचा काफीला आहे. यातील साधारणतः ४०० बसेस रोज नागपुरातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रवाशांच्या सेवेत धावतात. ऑफ सीजन मध्ये रोज नागपूर जिल्ह्यातून ७० ते ८० हजार प्रवासी प्रवास करतात. गणेशोत्सव मात्र एसटीसाठी भरभराट घेऊन येतो. गणेशोत्सवाच्या सध्याच्या काळात साधारणतः रोज एक लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. त्यामुळे एसटीच्या तिजोरीत रोज ८० ते ९० लाख रुपयांची भर पडत आहे.
विशेष म्हणजे, एसटीकडून समाजातील वेगवेगळ्या घटकांना प्रवास भाड्यात सवलत दिली जाते. गेल्या वर्षी राज्य शासनाकडून महिला मुलींना प्रवास भाड्यात सरसकट ५० टक्के सवलत जाहीर झाल्यापासून एसटीमध्ये प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेकदा गर्दी जास्त आणि गाड्या कमी असे चित्र दिसते. त्यामुळे एसटीचे प्रवासी नाईलाजाने नियोजित ठिकाणी पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायाचा वापर करतात. तूर्त मात्र जवळपास प्रत्येकच मार्गावर एसटीची लालपरी भरभरून धावताना दिसत आहे.
प्रवाशांची गैरसोय होणार नाही यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.
श्रीकांत गभणे व्यवस्थापक, एसटी नागपूर विभाग.