Nagpur: नागपुरातून अल्पवयीन मुलांची गॅंग ताब्यात, पाच गुन्ह्यांची झाली उकल
By योगेश पांडे | Updated: August 20, 2024 16:09 IST2024-08-20T16:08:40+5:302024-08-20T16:09:10+5:30
Nagpur News: उपराजधानीत अल्पवयीन मुलांच्या एका टोळीचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. चोरीच्या एका प्रकरणात ताब्यात घेतलेल्या या आरोपींच्या चौकशीतून एकूण पाच गुन्ह्यांची उकल झाली. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.

Nagpur: नागपुरातून अल्पवयीन मुलांची गॅंग ताब्यात, पाच गुन्ह्यांची झाली उकल
- योगेश पांडे
नागपूर - उपराजधानीत अल्पवयीन मुलांच्या एका टोळीचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. चोरीच्या एका प्रकरणात ताब्यात घेतलेल्या या आरोपींच्या चौकशीतून एकूण पाच गुन्ह्यांची उकल झाली. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
कुणाल कृष्णा चाफले (२३, संजय नगर, पांढराबोडी) यांच्या कार्यालयात १६ ऑगस्टच्या रात्री चोरी झाली होती. अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला व कपाटातून ३५ हजार रुपये रोख चोरून नेले होते. चाफले याच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान अंबाझरी पोलीस ठाण्यातील पथक गस्तीवर असताना पाच संशयित लोक त्यांना दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्यातील चार जण अल्पवयीन होते. तर हिमांशू उर्फ चिन्ना रामकृष्ण नारपीनवार (२०, अंबाझरी) असे पाचव्या आरोपीचे नाव होते. त्यांची चौकशी केली असता त्यांनी चाफलेकडे चोरी केल्याची कबुली दिली.
सखोल चौकशीदरम्यान त्यांनी आणखी चार गुन्हे केल्याची माहिती दिली. त्यांच्या ताब्यातून विना क्रमांकाची मोपेड, एमएच ३१ डीक्यू ०६२६, एमएच ३१ डीए ५६८२, एमएच ४९ एस ०१५६ व एमएच ३१ ईएल ४२०२ व एमएच ३१ बीयू ११७४ या दुचाक्या जप्त करण्यात आल्या. पोलिसांनी चिन्नाला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे, राजेश सोनावणे, अभय पुडके, मुनिन्द्र ईनवाते, दिनेश जुगनाहके, अमित भुरे, अंकुश घटी, सतिश कारेमोरे, रोमीत राऊत, आशीष जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.