लोकमत न्यूज नेटवर्करामटेक :वनविभागातील वनरक्षक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून काही तरुणांना लाखो रुपयांनी फसविल्याचा प्रकार नुकताच उघड झाला आहे. रामटेक पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील तिघांना अटक केली असून, एक जण फरार आहे. आरोपींनी तरुणांना प्रत्येकी किमान १२ लाख रुपयांची मागणी करीत त्यांच्याकडून १ लाख ५० हजार रुपये ते २ लाख रुपये स्वीकारल्याचे तसेच त्या तरुणांना वनरक्षकपदाचे बनावट नियुक्तिपत्र दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
गजानन नामदेव कानडे, रा. पुसद, जिल्हा यवतमाळ, विलास जाधव, रा. अमरावती आणि अंकित पानतावणे, रा. नागपूर अशी अटक करण्यात आलेल्या तर पिंटू वाळके असे फरार आरोपीचे नाव आहे. पवन जनार्दन काठोळे (२६, रा. मेहकर, जिल्हा बुलढाणा) याची काही दिवसांपूर्वी गजानन कानडे याच्याशी ओळख झाली. आपण खतविक्री एजंट असून, आपली वनविभागात ओळख असल्याचे पवनला सांगत नागपूर विभागात वनरक्षकपदी नोकरी लावून देण्याची बतावणी केली. त्यासाठी त्याने पवनला १२ लाख रुपयांची मागणी केली. नोकरी मिळण्याच्या आशेपोटी पवनने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि १ लाख ५० हजार रुपये दिले. एवढेच नव्हे तर उषा मस्के नामक तरुणीने गजाननला नोकरीसाठी २ लाख ३० हजार रुपये दिले.
या व्यवहारात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पवनने वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. आरोपींनी उर्वरित १० लाख ५० हजार रुपये घेण्यासाठी पतन आणि उषा मस्के यांना २९ डिसेंबर रोजी रामटेक येथे बोलावले होते. याची माहिती पवनने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली होती. त्यामुळे रामटेक बसस्थानक आणि तहसील कार्यालय परिसरात वनविभागाचे कर्मचारी आणि पोलिसांनी सापळा रचला. जेव्हा आरोपी पैसे घेण्यासाठी आले, तेव्हा पोलिसांनी गजानन कानडे, विलास जाधव व अंकित पानतावणे या तिघांना पकडले. पिंटू वाळके मात्र पोलिसांची नजर चुकवून पळून जाण्यात यशस्वी झाला.
याप्रकरणी रामटेक पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) कलम ३१८ (४), ३३६ (३), ३४० (२), ३४१ अन्वये गुन्हा दाखल केला असून, तपास ठाणेदार अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक राजकिरण मडावी हे करीत आहेत.
बनावट शिक्के व कार जप्त
आरोपींच्या ताब्यातून दोन कार जप्त केल्या. झडतीदरम्यान, त्या कारमध्ये विविध शासकीय कार्यालयांचे बनावट शिक्के आढळून आल्याने पोलिसांनी ते संपूर्ण साहित्य जप्त केले. ही टोळी याच बनावट शिक्क्यांच्या आधारे बनावट नियुक्तिपत्रे करून तरुणांना पाठवायचे, हेदेखील चौकशीत स्पष्ट झाले. या तिन्ही आरोपींना कामठी शहरातील न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पत्राने फुटले बिंग
गजानन कानडे याने २५ डिसेंबर २०२५ रोजी पवन काठोळे याच्या व्हॉट्सअॅपवर वनरक्षक पदाचे नियुक्तिपत्र पाठवले. त्या पत्रावर नागपूर वनवृत्ताचा शिक्का आणि गोंदिया येथील उपवनसंरक्षकांची स्वाक्षरी होती. या विसंगतीमुळे पवनला संशय आला. त्याने लगेच वनविभागातील त्याच्या मित्रांकडून त्या पत्राची पडताळणी केली. ते नियुक्तिपत्र बनावट असल्याचे समोर येताच त्याने रामटेक पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आणि बिंग फुटले.
Web Summary : A gang was arrested in Ramtek for deceiving youths with fake forest guard appointment letters, promising jobs for lakhs of rupees. They took ₹1.5-2 lakh from victims, with one suspect still at large. Police seized fake stamps and cars, revealing a wider fraud operation.
Web Summary : रामटेक में फर्जी वन रक्षक नियुक्ति पत्र से युवाओं को ठगने वाले गिरोह को गिरफ्तार किया गया। लाखों रुपये में नौकरी का वादा किया। पीड़ितों से ₹1.5-2 लाख लिए, एक संदिग्ध फरार। पुलिस ने नकली मुहरें और कारें जब्त की, जिससे बड़े पैमाने पर धोखाधड़ी का पता चला।