नागपुरातील गणेशपेठ बसस्थानक झाले चकाचक : प्रशासनाचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 00:08 IST2020-03-26T00:05:41+5:302020-03-26T00:08:04+5:30
मागील चार दिवसांपासून एसटी बसेसची वाहतूक बंद आहे. एकही प्रवासी बसस्थानकावर येत नसल्यामुळे बसस्थानकावर शांतता पसरली आहे. यामुळे एसटी प्रशासनाने बसस्थानकाचा संपूर्ण परिसर फिनाईल आणि सॅनिटायझरने स्वच्छ केला आहे.

नागपुरातील गणेशपेठ बसस्थानक झाले चकाचक : प्रशासनाचा पुढाकार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील चार दिवसांपासून एसटी बसेसची वाहतूक बंद आहे. एकही प्रवासी बसस्थानकावर येत नसल्यामुळे बसस्थानकावर शांतता पसरली आहे. यामुळे एसटी प्रशासनाने बसस्थानकाचा संपूर्ण परिसर फिनाईल आणि सॅनिटायझरने स्वच्छ केला आहे.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गणेशपेठ बसस्थानकावरील एसटी बसेसची वाहतूक मागील चार दिवसांपासून बंद करण्यात आली आहे. बसस्थानकावर एकही प्रवासी येत नसल्यामुळे बसस्थानक परिसरात शांतता पसरली आहे. केवळ चौकशी कक्षातील एक कर्मचारी आणि सुरक्षारक्षक वगळता सर्वच कर्मचाऱ्यांना सुटी देण्यात आली आहे. या काळात एसटी महामंडळाच्या प्रशासनाने संपूर्ण बसस्थानकाचा परिसर स्वच्छ करण्याचे ठरविले. त्यानुसार बुधवारी सकाळपासून बसस्थानकाच्या सफाईला सुरुवात करण्यात आली. बसस्थानकाचा २० हजार चौरस फुटांपेक्षा अधिक असलेला परिसर स्वच्छ करण्यात आला. फिनाईल आणि सॅनिटायझरने सर्व परिसर निर्जंतूक करण्यात आला. बसस्थानकावर प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या खुर्च्या, टेबल, कार्यालय, बसेस उभ्या राहत असलेला परिसर, स्वच्छतागृहाची स्वच्छता करण्यात आली. बसस्थानकाची स्वच्छता करण्यासाठी एसटी प्रशासनाने १० खासगी कामगार बोलावले आहेत. यातील ५ कामगार सकाळी ६ ते दुपारी ३ पर्यंत आणि दुुसरे ५ कामगार दुपारी ३ ते रात्री ११ दरम्यान बसस्थानकाची स्वच्छता करीत आहेत. बसस्थानकावर एकही प्रवासी नसल्यामुळ े बसस्थानकाचा कानाकोपरा स्वच्छ करणे सोयीचे झाल्याचे मत आगार व्यवस्थापक अनिल आमनेरकर यांनी व्यक्त केले.
१०० बसेसही झाल्यात स्वच्छ
सध्या गणेशपेठ आगाराच्या परिसरात १०० एसटी बसेस उभ्या आहेत. बसेसची वाहतूकच बंद असल्यामुळे एसटी प्रशासनाने या १०० बसेसची फिनाईल आणि सॅनिटायझरद्वारे सफाई केली आहे. सर्व बसेस आतून आणि बाहेरून स्वच्छ करण्यात आल्या आहेत.