निवडणूक याचिका फेटाळण्याकरिता गायकवाड, कुटे, अडसड यांचे अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 15:59 IST2025-08-02T15:59:23+5:302025-08-02T15:59:52+5:30

हायकोर्ट : २२ ऑगस्ट रोजी अंतिम सुनावणी

Gaikwad, Kute, Adsad's application to dismiss election petition | निवडणूक याचिका फेटाळण्याकरिता गायकवाड, कुटे, अडसड यांचे अर्ज

Gaikwad, Kute, Adsad's application to dismiss election petition

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
आमदार संजय गायकवाड, संजय कुटे व प्रताप अडसड यांनी स्वतः विरुद्धच्या निवडणूक याचिका फेटाळून लावण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केले आहेत. त्या अर्जावर येत्या २२ ऑगस्ट रोजी अंतिम सुनावणी होणार आहे.


मविआच्या पराभूत उमेदवार जयश्री शेळके (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी गायकवाड (शिवसेना-एकनाथ शिंदे), स्वाती वाकेकर (काँग्रेस) यांनी कुटे (भाजप) तर, वीरेंद्र जगताप (काँग्रेस) यांनी अडसड (भाजपा) यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली आहे. गायकवाड यांनी बुलढाणा, कुटे यांनी जळगाव जामोद तर, अडसड यांनी धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघामधून विजय मिळविला आहे. त्यांची निवड रद्द करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. आमदारांनी निवडणूक याचिकांना दिवाणी प्रक्रिया संहितेतील सातव्या ऑर्डरमधील नियम ११ आणि लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम ८६ (६) अंतर्गत विरोध केला आहे. कलम ८१ (३) मधील निकषांसह विविध तरतुदींची पूर्तता करीत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. 


मागितले उत्तर
या प्रकरणावर शुक्रवारी न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने प्रकरणावर २२ ऑगस्ट रोजी अंतिम सुनावणी निश्चित करून याचिकाकर्त्यांना आमदारांच्या अर्जावर १५ ऑगस्टपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. पवन डहाट तर, आमदारांतर्फे वरिष्ठ अॅड. सुनील मनोहर व अॅड. राजा दंडवते यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Gaikwad, Kute, Adsad's application to dismiss election petition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर