गडकरींची स्पष्टोक्ती, नागपुरातूनच निवडणूक लढविणार ‘चना पोहा विथ नितीन गडकरी’ या मुलाखतपर कार्यक्रमाचे आयोजन
By योगेश पांडे | Updated: January 12, 2026 23:29 IST2026-01-12T23:28:18+5:302026-01-12T23:29:09+5:30
प्रसिद्ध अभिनेत्री गिरीजा ओक-गोडबोले यांनी त्यांनी मुलाखती घेतली. नागपूर माझी जन्मभूमी आणि कार्यभूमी ही आहे. मी नागपूरचा असून नागपूरकर माझे कुटुंब आहेत.

गडकरींची स्पष्टोक्ती, नागपुरातूनच निवडणूक लढविणार ‘चना पोहा विथ नितीन गडकरी’ या मुलाखतपर कार्यक्रमाचे आयोजन
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पुढील लोकसभा निवडणूकीसाठी भाजपचे उमेदवार बदलले जाणार असल्याच्या चर्चांना बरेचदा उधाण येत असते. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे. पंजाब मधून कुठूनही उभे रहा, आम्ही तुम्हाला निवडून देऊ, असे पंजाबचे तत्कालिन मुख्यमंत्री मला म्हणाले होते. देशातील अनेक ठिकाणातून निवडणूक लढवण्याची मला ऑफर येते.. मात्र मला नागपुरनेच ओळख दिली असून मी येथूनच निवडणूक लढवेल असे गडकरी यांनी स्पष्ट केले. सोमवारी रात्री सक्करदरा नासुप्र उद्यानात ‘चना पोहा विथ नितीन गडकरी’ या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
प्रसिद्ध अभिनेत्री गिरीजा ओक-गोडबोले यांनी त्यांनी मुलाखती घेतली. नागपूर माझी जन्मभूमी आणि कार्यभूमी ही आहे. मी नागपूरचा असून नागपूरकर माझे कुटुंब आहेत. नागपुरात महापालिका निवडणूक यंदा ही आम्ही निश्चित जिंकणारच.. मागचा रेकॉर्ड आम्ही तोडणार की नाही एवढाच प्रश्न आहे. नागपुरात एक लाख लोक बसू शकतील असे स्टेडियम व २५ स्विमिंग पूल बांधायचे आहे. नागपूरकरांचा सुखांक वाढावा असे आमचे प्रयत्न आहे. दोन वर्षांअगोदर अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो होऊन पूर परिस्थिती निर्माण झाली व लोकांचे नुकसान झाले, कारण नाग नदीच्या अवती भवती अतिक्रमण झाले होते आणि आता आम्ही ते काढले आहे.. नाग नदीच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू केले आहे, असे गडकरी यांनी सांगितले.
पार्किंगबाबत नागरिकांनी सजग व्हावे
नागपुरात पार्किंगची समस्या अनेक ठिकाणी दिसून येते. आम्ही अनेक ठिकाणी पार्किंग साठी नियोजन करणे सुरू केले आहे. बरेच नागपूरकर बिल्डिंग बांधतात मात्र त्याच्या आत पार्किंग न ठेवता गाड्या बाहेर रस्त्यावर ठेवतात. नागरिकांनी याबाबत सजग व्हावे असे गडकरी म्हणाले.
बिबट्यांचे कुटुंब नियोजन आवश्यक
नागपुरात काही महिन्यांत बिबट्यांमुळे दहशत निर्माण झाली आहे. यावरदेखील गडकरी बोलले. नागपुरच्या जवळपास एवढे वाघ आणि बिबटे आहेत की त्यांचे कुटुंब नियोजन करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
राजकारणात इनकमिंग-आऊटगोईंगमध्ये वेगाने वाढ
मागील काही काळापासून लोक सत्ताकेंद्रीत झाले आहेत. ते डाव्या किंवा उजव्या विचारसरणीचे राहिलेले नाहीत. तर संधीसाधू झाले आहेत. ज्या पक्षाची सत्ता आहे त्यात घुसा आणि सत्तेचा लाभ घ्या अशी स्थिती झाली आहे. राजकारणत इनकमिंग-आऊटगोईंगमध्ये वेगाने वाढ झाली आहे, असे गडकरी म्हणाले.