गडकरी यांनी केली श्रीरामांची पूजा, रामरक्षेतून रामनामाचा जप
By योगेश पांडे | Updated: January 22, 2024 16:13 IST2024-01-22T16:12:59+5:302024-01-22T16:13:32+5:30
योगेश पांडे - नागपूर नागपूर : अयोध्येत प्राणप्रतिष्ठा समारंभ सुरू असताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात ...

गडकरी यांनी केली श्रीरामांची पूजा, रामरक्षेतून रामनामाचा जप
योगेश पांडे - नागपूर
नागपूर : अयोध्येत प्राणप्रतिष्ठा समारंभ सुरू असताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात निवासस्थानी तसेच मंदिरांमधध्ये रामपुजन केले. त्यांच्या निवासस्थानी विशेष पुजेचे आयोजन करण्यात आले होते व रामरक्षेतून त्यांनी रामनामाचा जप केला.
सकाळी गडकरी यांच्या निवासस्थानी आयोजित पूजेमध्ये नितीन गडकरी सहभागी झाले. यावेळी त्यांनी रामरक्षा, हनुमान स्तोत्र पठण तसेच श्रीरामाची आरती केली. यावेळी त्यांच्या पत्नी कांचन गडकरी व संपूर्ण गडकरी कुटुंबीय आवर्जून उपस्थित होते. यावेळी सोनुताई अग्निहोत्री मूकबधिर शाळेचे विद्यार्थी देखील उपस्थित होते. त्यानंतर पोद्दारेश्वर राम मंदिर, खामला येथील जनसंपर्क कार्यालय आणि बजेरिया येथील अवध महोत्सवातदेखील गडकरी यांनी हजेरी लावली.
पोद्दारेश्वर राम मंदिरामध्ये त्यांनी श्रीरामाचे दर्शन घेतले.
- स्वप्नपूर्ती झाली, रामराज्याच्या दिशेने पाऊल
अयोध्या धाममध्ये कोट्यवधी भारतीयांचे आराध्य दैवत असलेल्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांच्या भव्य-दिव्य मंदिराचे बांधकाम आणि श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठा हे रामराज्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. याबद्दलचा आनंद शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवतजी आणि सर्व संतांच्या उपस्थितीत श्रीरामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला आणि सर्व भारतीयांचे स्वप्न साकार झाले. हजारो कारसेवक आणि रामभक्तांची प्रतीक्षा आज पूर्ण झाली. प्रभू श्रीरामाच्या या मंदिरासाठी शतकानुशतके झगडणाऱ्या आणि त्याग करणाऱ्या सर्व कारसेवकांप्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो, अशी भावना गडकरी यांनी व्यक्त केली.