लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: गोंदिया- बल्लारशाह रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी ४,८१९ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे अनेक वर्षापासूनचा प्रलंबित असलेला हा प्रकल्प आता मार्गी लागला आहे. यामुळे विदर्भातील व्यापार छत्तीसगड आणि तेलंगणात पसरवण्यासाठी महत्त्वाची मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. रेल्वेच्या विविध प्रकल्पांच्या माहितीच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री फडणवीस आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संबोधित केले. यावेळी लिंकच्या माध्यमातून महाराष्ट्रातून ठिकठिकाणहून अशोक उईके, आशिष जयस्वाल, खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुधीर मुनगंटीवार तसेच नागपुरातून दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे नागपूर विभागीय व्यवस्थापक दीपककुमार गुप्ता, मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक विनायक गर्ग, सिनीअर डीसीएम दिलीप सिंग, एडीआरएम एस. पी. चंद्रिकापुरे, पीएस खैरकार, क्रिष्णाथ पाटील उपस्थित होते.
प्रारंभी बोलताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पाचा आढावा मांडला. महाराष्ट्रात १ लाख, ७३ हजार कोटींचे रेल्वे प्रकल्प आले असून, बजेटमध्ये महाराष्ट्रात २३,७७८ कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. कोलकाता-मुंबई रेल्वेमार्गावरील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे. या प्रकल्पांवर ४८१९ कोटी रुपये खर्च होणार आहे. या रेल्वेमार्गासह १५ जिल्ह्यांमध्ये एकूण १,२४७किलोमीटर नवीन रेल्वे मार्गाचा विस्तार करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र, ओडिशा आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये रेल्वे नेटवर्कचा मोठा विस्तार होणार आहे. पीएम गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन अंतर्गत मल्टिमोडल कनेक्टिव्हिटी अंतर्गत पाचव्या आणि सहाव्या रेल्वे लाइनच्या बांधकामामुळे नवीन रेल्वेगाड्या सुरू करता आहे.
कोट्यवधीच्या डिझेलची बचतया प्रकल्पांतर्गत गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर हे लाभार्थी जिल्हे असून, रेल्वेस्थानके, ४८ मोठे पूल, ३४९ छोटे पूल, १४ आरओबी, १८४ आरयूबी, ५ रेल्वे उड्डाणपूल राहील. या रेल्वेमार्गाची लांबी २७८ किमी असून, रेल्वे ट्रॅकची लांबी ६१५ किमी आहे. नवीन रेल्वे नेटवर्कच्या निर्मितीमुळे कोट्यवधी लिटर डिझेलची बचत होणार आहे.