लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. संघाच्या कार्यक्रमांना आजपर्यंत विरोधी विचारधारांचे लोकदेखील उपस्थित राहिले आहेत व तो नेहमीच चर्चांचा विषय असतो. आजपर्यंत विविध क्षेत्रांतील मान्यवरांना संघाकडून निमंत्रण देण्यात आले. तसेच शंभर वर्षांच्या इतिहासात संघाच्या उत्सवात नागपुरातील भोसले घराण्याचीदेखील मोठी सक्रियता दिसून आली. तसेच डॉ. हेडगेवार तसेच गोळवलकर गुरुजी सरसंघचालक असताना फतेहसिंहराजे भोसले हे तर सहाहून अधिक वेळा मुख्य अतिथी होते.
संघ स्थापनेपासूनच नागपुरातील भोसले घराणे हे संघाशी जुळले होते. प्रत्येक विजयादशमी उत्सवात भोसले घराण्यातील सदस्यांना संघाकडून निमंत्रण जायचे व तेदेखील उत्सवात सहभागी व्हायचे. विद्यमान मुधोजीराजे भोसले यांचे आजोबा श्रीमंत राजबहादूर फतेहसिंगराजे भोसले हे तर १९३३ ते १९७० या कालावधीत सहाहून अधिक वेळा मुख्य अतिथी म्हणूनदेखील उपस्थित राहिले. आजही भोसले घराण्याची संघाशी नाळ जुळली आहे. सुरुवातीच्या काळात महालातील टाऊन हॉलला विजयादशमीचा कार्यक्रम व्हायचा व विजयादशमी उत्सवाचे नवमी-दशमी असे दोन दिवस आयोजन व्हायचे. संघाच्या पथसंचलनात भोसले घराण्यातील सदस्य पारंपरिक राजवेशात सहभागी व्हायचे, अशी माहिती नागपूरकर भोसले इतिहासाचे संशोधक डॉ. भालचंद्र हरदास यांनी दिली.
देशविदेशातील अतिथी पोहोचले संघस्थानी
संघाची स्थापना झाल्यानंतर डॉ. हेडगेवार यांचे स्वयंसेवकांना मार्गदर्शन असायचेच. मात्र समाजातील मान्यवर लोकांना संघ प्रणाली पाहता यावी व त्यांच्या अनुभवाचे बोल स्वयंसेवकांना ऐकता यावे यासाठी त्यांना मुख्य अतिथी म्हणून बोलविण्यास सुरुवात झाली. १९३३ साली श्रीमंत राजबहादूर फतेहसिंगराजे भोसले महाराज यांना मुख्य अतिथी म्हणून बोलविण्यात आल्याची नोंद आहे. त्यानंतर संघाच्या उत्सवांना वैज्ञानिक-वकील-अध्यात्मातील मान्यवरांची उपस्थिती राहिली. मागील काही वर्षांमध्ये संघाचा विस्तार वेगाने झाला व देशविदेशात नाव कमाविलेली आणि थेट संघ विचारधारेशी संबंध नसलेली मंडळीदेखील संघस्थानी मुख्य अतिथी म्हणून पोहोचली. यात काही नामांकित उद्योजक, नोबेल पुरस्कार विजेते, समाजसेवक, संगीतकार यांचादेखील समावेश होता.आतापर्यंत उपस्थित झालेले प्रमुख अतिथी
-श्रीमंत राजबहादूर फतेहसिंगराजे भोसले-डॉ. हरीसिंग गौर-बॅ. डी. टी. राव-स्वामी चिन्मयानंद-गुरुदत्त-एन. जी. रंगा-अरुण शौरी-विजय भटकर-समछोंग रिनपोछे-स्वामी विश्वदेवानंद-भय्यूजी महाराज-पं. ह्रद्यनाथ मंगेशकर-दयानंद सरस्वती-डॉ.व्ही. के. सारस्वत-बाबासाहेब पुरंदरे- कैलास सत्यार्थी- शिव नादर- संतोष यादव- शंकर महादेवन