मित्रांनीच केला तरुणाचा दगडाने ठेचून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 22:26 IST2019-05-30T22:25:34+5:302019-05-30T22:26:37+5:30
पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाचा त्याच्या मित्रांनीच दगडाने ठेचून निर्घृण खून केला. ही घटना बुधवारी रात्री गिट्टीखदान परिसरातील काटोल नाक्याजवळ घडली.

मित्रांनीच केला तरुणाचा दगडाने ठेचून खून
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाचा त्याच्या मित्रांनीच दगडाने ठेचून निर्घृण खून केला. ही घटना बुधवारी रात्री गिट्टीखदान परिसरातील काटोल नाक्याजवळ घडली. अंकित तिवारी रा. एमआयडीसी राजीवनगर असे मृत तरुणाचे नाव आहे. विशाल गयाप्रसाद डेहरवाल (१९), सुनील ईश्वरी डेहरवाल (२१) दोन्ही रा. खडगाव रोड भीमनगर आणि राहुल सियाराम डेहरवाल (१९) रा. कळमना अशी आरोपींची नावे आहेत.
सूत्रानुसार मृत अंकित आणि आरोपी हे मूळचे मध्य प्रदेशातील विनी येथील रहिवासी आहेत. ते सर्व वाडीतील एका पेट्रोल पंपावर काम करीत होते. तिथे अंकित आरोपींना बळजबरीने मारहाण करायचा. त्यांना घाबरवायचा. बुधवारी अंकितने त्याच्या एका मित्राची बाईकही बळजबरीने हिसकावून घेतली होती. त्यामुळे त्यांचा अंकितसोबत वादही झाला होता. यानंतर आरोपींनी अंकितचा काटा काढण्याचे ठरविले. आरोपींनी त्याला बुधवरी रात्री काटोल रोडवरील ढाब्यावर जेवणासाठी बोलावले. ढाब्यावर जेवण केल्यानंतर त्यांनी अंकितसोबत बाईक हिसकावल्याच्या घटनेवरून पुन्हा वाद केला. या वादात त्यांनी निर्जन स्थळ पाहून अंकितच्या डोक्यावर रॉडने वार केला. यानंतर त्याच्या डोक्यावर दगडांनी वार करून त्याला संपविले. पहाटे ३.३० वाजता काटोल रोडवरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळून आला. यापैकी एकाने गिट्टीखदान पोलिसांना सूचना दिली. सूचना मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला. गुरुवारी सकाळी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली.